सिन्नर : जिल्हा परिषद सेस फंडातून अनुसूचित जाती-जमातीच्या विद्यार्थांच्या ऑनलाईन शिक्षण प्रणालीसाठी खर्च करण्यात यावा, अशी मागणी कासारवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते बबनराव जगताप यांनी जिल्हा समाजकल्याण अधिकाऱ्यांकडे केली आहे.
नाशिक जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनुसूचित जाती-जमातीच्या लोकांचा जीवनस्तर उंचावण्यासाठी जिल्हा परिषद सेस फंडातून विविध कल्याणकारी योजना दरवर्षी राबविल्या जातात. सध्याची महामारीची परिस्थिती लक्षात घेता ग्रामीण भागातील अनुसूचित जाती-जमातीच्या कुटुंबातील मुले, मुली ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहत असल्याने त्यांना या प्रवाहात आणण्यासाठी जिल्हा परिषद सेस फंड या विद्यार्थांना मोबाईल खरेदी, इंटरनेट सुविधा, कॉम्प्युटर खरेदी अथवा तत्सम बाबींसाठी खर्च करावा. ऑनलाईन शिक्षण प्रवाहाच्या बाहेर राहणाऱ्या मुलांना पुन्हा शिक्षण प्रवाहात सामील करून घेण्यासाठी योग्य त्या यंत्रणांना आदेश देण्यात यावेत, अशी मागणी जगताप यांनी केली आहे.
इन्फो...
ऑनलाईनमुळे शिक्षण व्यवस्था पूर्वपदावर
दोन वर्षांपासून उद्भवलेल्या कोरोना महामारीने त्रस्त असलेल्या देशभरातील शिक्षण व्यवस्था कोलमडून पडली असली तरी ऑनलाईन प्रणालीचा वापर करून शिक्षण व्यवस्था पूर्वपदावर आणण्याचा प्रशासनाचा प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद आहे. याही परिस्थितीत विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात कायम ठेवले, ते महत्त्वाचे असल्याचे जगताप यांनी म्हटले आहे.