नाशिक : सिडको आणि सातपूर विभागातील महावितरणच्या हलगर्जीपणामुळे एका मुलाचा मृत्यू झाल्याने मनपा सभागृह नेते दिनकर पाटील यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. वीजतारा भूमिगत करणे आणि अन्य सुधारणा न केल्यास आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला.सिडको आणि सातपूर विभागात वीजपुरवठ्यात अनेक दोष असून, या संदर्भात राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना त्याबाबत अवगत करण्यात आले. या समस्या सोडविण्यासाठी बाराशे कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला, त्यातील ८५ कोटी रूपये महावितरणला प्राप्त झाले आहे. परंतु तरीही तारा भूमिगत करण्यासह अन्य कामे झालेले नाहीत. विद्युत विभागाच्या दिरंगाईमुळे शिवाजीनगर येथील योगेश अमृत पाटील या मुलाला जीव गमवावा लागला आहे. अशाप्रकारची दुर्घटना घडल्याने नागरिक संतप्त झाले असून, कारभारात सुधारणा न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. यासंदर्भात महावितरणचे शहर अभियंता पी. एम. दरोली यांना मनपा सभागृह नेते दिनकर पाटील, नगरसेवक रवींद्र देवरे, हेमलता कांडेकर, नाशिक शहर भाजयुमोचे चिटणीस अमोल पाटील, अनिल भालेराव आदींसह नागरिकांनी निवेदन दिले.
वीज मंडळाच्या दिरंगाईविरोधात निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 12:27 AM