नाशिक : गुंतवणुकीवर जादा व्याजाचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या ‘साई डे स्टार मल्टिट्रेड प्रायव्हेट लिमिटेड’ने गुंतवणूकदारांना सुमारे ३५ लाख रुपयांना फसविल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे़ दरम्यान, या गुन्ह्याचा तपास करणाऱ्या सरकारवाडा पोलिसांनी फसवणूक झालेल्या वा कंपनीत गुंतवणूक केलेल्यांना तक्रारीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे़ निफाड तालुक्यातील डोंगरगाव येथील एकनाथ सुधाकर नागरे (३७) यांनी डिसेंबर २०१५ मध्ये सरकारवाडा पोलीस ठाण्यात साई डे स्टार मल्टिट्रेड प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक विजय नंदू वानखेडे, सीमा विजय वानखेडे (दोघे रा. स्मिता अपार्टमेंट, पाटील लेन, कॉलेजरोड), अमोल प्रभाकर बाविस्कर व अजय अशोक राणे (दोघे रा. अमिगो रॉयल, गुलमोहर कॉलनी, ध्रुवनगर) यांनी कंपनीत गुंतवणूक करून घेऊन लाखो रुपयांची फसवणूक केल्याची फिर्याद दिलेली आहे़नागरे हे नायजेरिया येथील नोकरीहून परतल्यानंतर त्यांचे परिचित डॉ़ शीतल सूर्यवंशी यांनी या कंपनीमध्ये गुंतवणुकीबाबत माहिती दिली होती़ गोट फार्मिंग, रियल इस्टेट, कादां शीतगृह गोडावून, इम्पोर्ट, एक्स्पोर्ट या प्रकारचे व्यवसाय कंपनीमार्फत केले जात असल्याचे त्यांना सांगण्यात आले होते़ तसेच रत्नागिरी, दापोली येथे सुरू असलेल्या हॉटेलचे बांधकामही विश्वास संपादन करण्यासाठी दाखविण्यात आले होते़ नागरे यांनी कंपनीत ७ फेब्रुवारी २०१३ ते २१ एप्रिल २०१४ या कालावधीत ३४ लाख ६७ हजार रुपयांची गुंतवणूक केली़ या गुंतवणुकीवर २५ महिन्यांनंतर २५ टक्क्यांहून अधिक परतावा देण्याचे आमिष संचालकांनी दाखविले होते़ या कंपनीतील गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीच्या पावत्यांसह तक्रारीसाठी पुढे येण्याचे आवाहन सरकारवाडा पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक एस. ई. कांबळे यांनी केले आहे़ (प्रतिनिधी)
साई मल्टिट्रेडच्या गुंतवणूकदारांना तक्रारीचे आवाहन
By admin | Published: October 20, 2016 1:50 AM