नामपूर : येत्या २४ सप्टेंबरचा क्रांती मोर्चा यशस्वी करण्यासाठी बागलाण तालुक्यातील सर्व शाळा -महाविद्यालये बंद ठेवण्याचे आवाहन जिल्हा परिषद सदस्य शैलेश सूर्यवंशी यांनी तालुका दौऱ्यात केले आहे. बागलाण तालुक्यातील नामपूर गटाचा दौरा नुकताच संपन्न झाला असून, या दौऱ्यात ज्येष्ठ नेते रामचंद्र पाटील, डॉ. भामरे, भाऊसाहेब अहिरे, अनिल पाटील, यतिन पगार, प्रशांत पाटील, सिंधूबाई सोनवणे, अरविंद सोनवणे, रमेश पवार, खेमराज कोर, विनोद पाटील, संभाजी सावंत, संजय भामरे, कृष्णा भामरे, काकाजी रौंदळ, पांडुरंग सोनवणे, दीपक पगार, बाजीराव सावंत हे गावागावात बैठका घेऊन २४ सप्टेंबरच्या क्रांती नियोजनबाबत जनजागृती करीत आहेत. यात आपल्या प्रमुख मनोगतातून जिल्हा परिषद सदस्य शैलेश सूर्यवंशी यांनी आपल्या भाषणात, हा मोर्चा कोणत्याही जाती-धर्माविरोधात नाही. आजच्या घडीला मराठा समाजावर जो अन्याय होत आहे. त्याला वाचा फोडण्याकरिता हा मोर्चा असून, अॅट्रॉसिटी कायदा रद्द करावा, आरक्षण पद्धत रद्द करावी, समान नागरी कायदा लागू करावा, कोपर्डी घटनेतील आरोपींना तत्काळ फाशीची शिक्षा जाहीर करावी, सैराटसारखे चित्रपट बंद करावेत यासारख्या अन्य बाबी शैलेश सूर्यवंशी यांनी मांडल्या. या प्रत्येक गावनिहाय बैठकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी महाराज, महात्मा फुले यांच्या नावाचे स्मरण मनोगतातून व्यक्त होत होते. इतर समाजातील नेतेसुध्दा यात सहभागी झाले होते.यात ज्येष्ठ नेते रामचंद्र पाटील यांनी कोपर्डी घटनेतील बालिकेला श्रद्धांजली वाहन्याकरिता २४ तारखेला तालुक्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, महाविद्यालये बंद ठेवून शालेय मुलांनी काळा शर्ट, काळी पॅन्ट व कपाळावर काळी पट्टी बांधून निषेध व्यक्त करण्याचे आवाहन रामचंद्र पाटील यांनी व्यक्त केले आहे. नामपूर गटात या गांव बैठकाना मोठा प्रतिसाद लाभत आहे. (वार्ताहर)
शाळा-महाविद्यालय बंद ठेवण्याचे आवाहन
By admin | Published: September 14, 2016 10:19 PM