राज्यामध्ये प्रयोगशील शेतकऱ्यांचा गौरव केल्यास, त्यांचे मनोबल वाढण्यास मदत होईल. हा उद्देश ठेवून राज्यात कृषी विभागामार्फत पीक स्पर्धा योजना राबविण्यात येत आहे. सध्याच्या पीकस्पर्धेतील महत्त्वाच्या बाबी- पीक स्पर्धेसाठी पीकनिहाय तालुका हा एक घटक आधारभूत धरण्यात येईल.
खरीप हंगामासाठी स्पर्धेतील समाविष्ट पिके- भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी ), तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग, सूर्यफूल अशी एकूण ११ पिके आहेत. प्रति तालुका किमान स्पर्धक संख्या - सर्वसाधारण गटासाठी दहा व आदिवासी गटासाठी पाच स्पर्धक असतील. पीक स्पर्धेमध्ये सहभागी लाभार्थीचे त्या पिकाखाली किमान दहा आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे. पुरेसे अर्ज प्राप्त झाल्यानंतर संबंधित पिकाची पीकस्पर्धा संबंधित तालुका कृषी अधिकारी जाहीर करतील. तालुक्यात पीक कापणी प्रयोग घ्यावयाची किमान संख्या - सर्वसाधारण गटासाठी पाच व आदिवासी गटासाठी पाचएवढी आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकासाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल. प्रवेश शुल्क सर्व गटांसाठी पीकनिहाय प्रत्येकी रक्कम रुपये तीनशे असणार आहे. मूग व उडीद पिकासाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ३१ जुलै, तर भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भुईमूग व सूर्यफूल पिकासाठी ३१ ऑगस्टपर्यंत आहे. तरी पीक स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांचे अर्ज विहित नमुन्यामध्ये भरून त्यासोबत ठरवून दिलेले प्रवेश शुल्क चलन, सातबारा उतारा, आठ अचा उतारा व जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास) या कागदपत्रांची पूर्तता करून, तालुका कृषी अधिकारी कार्यालयात द्यावेत. अधिक माहितीसाठी कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक व मंडळ कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.