------------------
रहाटळ यांच्या कुटुंबीयांचे शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन
सिन्नर: धोंडबार येथील शिवछत्रपती शिवाजी विद्यालयात २१ वर्षांपासून काम करणाऱ्या केशव रहाटळ यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. याबाबत कुटुंबीयांच्या मागणीचे निवेदन मुलगी प्रथमा रहाटळ यांनी गटशिक्षणाधिकारी मंजुषा साळुंखे यांना दिले. रहाटळ अल्पशा मानधनावर २१ वर्षांपासून काम करीत होते. त्यांच्या मृत्यूनंतर संस्थेने भविष्यनिर्वाह निधीसह पाच लाख रुपयांची तातडीची मदत द्यावी, असे निवेदन देण्यात आले आहे.
----------------------
घोटेवाडी विलगीकरणास रोटरीकडून पाच बेड
सिन्नर : तालुक्यात घोटेवाडी येथे ग्रामपंचायत आणि लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या कोरोना विलगीकरण कक्षासाठी रोटरी क्लब ऑफ सिन्नरकडून पाच बेडची भेट देण्यात आली. त्यामुळे १० बेडची क्षमता असलेल्या विलगीकरणाची क्षमता आता १५ झाली आहे. रोटरी क्लबचे अध्यक्ष उदय गायकवाड, निशांत माहेश्वरी, चैतन्य कासार, कैलास क्षत्रिय, वैभव मुत्रक, संजय आणेराव यांनी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांकडे बेड सुपुर्द केले.
-----------------------
खरीप हंगामासाठी शेतकरी मशागतीत व्यस्त
सिन्नर: शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या खरीप हंगामासाठी शेतकरी तयारीला लागला असून, मशागतीच्या कामांमध्ये शेतकरी व्यस्त आहे. खरीप हंगाम काही दिवसांवर येऊन ठेपला असल्याने, शेतकरी मशागतीचे काम करीत आहेत. बी-बियाण्यांची जुळवाजुळव करीत आहे. शेतामध्ये शेतखत टाकण्याचीही लगबग करीत आहेत.
----------------
वावी बाजारपेठेत भाजीपाला खरेदीसाठी गर्दी
वावी: सिन्नर तालुक्यातील वावी येथे मंगळवारी सकाळी भाजीपाला खरेदीसाठी झुंबड उडाल्याचे दिसून आले. बारा दिवसांच्या कडक लॉकडाऊननंतर मंगळवारी सकाळी आठवडे बाजाराच्या मैदानावर भाजीविक्रेत्यांना ठरवून दिलेल्या जागेवर शेतकरी व विक्रेते भाजीपाला विक्रीसाठी बसले होते. यावेळी ग्राहकांनी गर्दी केली होती. सकाळी ११ वाजता भाजीबाजार संपला.