त्र्यंबकेश्वर : महिलांना सायबर क्राइमद्वारे त्रास देण्याचे प्रकार हल्ली घडतात. महिलांनी याबाबत माहिती घेतली पाहिजे. सायबर गुन्हेगारी हल्ली बोकाळली असून महिला संरक्षणार्थ असलेल्या कायद्याच्या आधारे महिलांनी आपले संरक्षण करावे असे प्रतिपादन अॅड. मीलन खोहर यांनी केले. त्र्यंबकेश्वर भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीतर्फे आयोजित महिला दिन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष विजया लढ्ढा होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार डॉ. निशिगंधा मोगल, नगरपालिकेच्या मुख्याधिकारी डॉ. चेतना केरुरे-मानुरे यांसह जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत गायधनी शहराध्यक्ष श्याम गंगापुत्र, सुचिता शिखरे, मेघा दीक्षित, अश्विनी अडसरे, सुयोग वाडेकर आदि उपस्थित होते. यावेळी अॅड. खोहर यांनी सायबर गुन्ह्यांची रंजक पण सखोल माहिती दिली. निशिगंधा मोगल यांनी आपल्या मनोगतात भारतीय इतिहासातील कर्तबगार महिलांच्या कामगिरीचा आढावा घेतला. त्यांच्याबद्दल बोलताना जिजाऊ माँसाहेबांसारखे संस्कारक्षम मातृत्व लाभले पाहिजे. आपल्या मुलांवर असे संस्कार महत्त्वाकांक्षा केल्या तरच आपली मुले-मुली कर्तबगार होतील. अहल्याबाई होळकरांबाबत त्या म्हणाल्या, अहल्याबाई होळकरांनी कुशल प्रशासन देऊन राज्य कारभार केला. आपल्या व्यक्तिगत खर्चासाठी त्यांनी कधी सरकारी खजिन्यातील पैसा वापरला नाही. जनतेच्या पैशातून केलेल्या सुविधा आजही विहिरी, बारवा, धर्मशाळा अवशेषांच्या स्वरूपात पाहावयास मिळतात. अशा महिलांच्या कार्यकर्तृत्वाचे कौतुक करून त्यांचा आदर्श आपण व विशेष करून अधिकारी महिलांनी घ्यावा, असेही त्या म्हणाल्या. डॉ. माधवी लोंढे यांनी मनोगतात महिलांनी मानसिकदृष्ट्या सक्षम झाले पाहिजे, असे मत मांडले. नगराध्यक्ष विजया लढ्ढा यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्र माच्या प्रारंभी चिमुरड्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. यावेळी भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्ष माधुरी वैभव जोशी, सुनीता सारडा, ऋत्विजा फडके, अनुराधा पाटील, प्रणिता पाटणकर, स्नेहल भालेराव, पूनम पाटील, वंदना गंगापुत्र, पल्लवी शिंगणे, सुवर्णा वाडेकर, रेखा भुतडा, मंजूषा चांदवडकर, मनीषा बदादे आदि कार्यकारिणी सदस्य उपस्थित होत्या.
अन्यायाविरोधात कायद्याचा आधार घेण्याचे आवाहन
By admin | Published: March 10, 2017 1:03 AM