ख्रिसमसनिमित्त बाजारात उत्साह
नाशिक : ख्रिसमसनिमित्त शहरात ख्रिस्ती समाजाच्यावतीने विविध वस्तूंची खरेदी केली जात असल्याने बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण पसरले आहे. ख्रिसमससाठी बाजारात विविध वस्तू दाखल झाल्या आहेत. दिवाळीनंतर प्रथमच बाजारात खरेदीसाठी नागरिकांची गर्दी दिसू लागली आहे. यामुळे अनेक किरकोळ विक्रेत्यांना दिलासा मिळाला आहे.
सिन्नर फाट्याजवळ रस्त्याची दुरवस्था
नाशिक : नाशिक-पुणे महामार्गावर सिन्नर फाटा परिसरात रस्त्याची दुरवस्था झाली असून, या ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. या परिसरातील रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी परिसरातील वाहनचालकांनी केली आहे.
बिटको चौकात वाहतुकीस अडथळा
नाशिक : नाशिकरोड परिसरात बिटको चौकात असलेल्या विविध दुकानांसमोरील रस्त्यावर वाहने उभी राहत असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. वाहनांमुळे जवळपास अर्धा रस्ता व्यापाला जात असल्याने पायी चालणेही कठीण होते. काही वेळा अपघाताची शक्यता निर्माण होत असते. रसत्यावर वाहने उभी करण्यास प्रतिबंध करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
कॅनॉल रोडवर वाहन चालविणे जिकिरीचे
नाशिक : उपनगर नाका येथून जेल टाकीकडे जाणाऱ्या कॅनॉल रोडवर अनेक लहान मुले रस्त्यात खेळत असल्याने या मार्गावरून वाहन चालविणे जिकिरीचे झाले आहे. काही ठिकाणी रस्त्यावर अतिक्रमण झाले असून, परिसरातील रहिवासी वाहने उभी करतात. यामुळे हा रस्ता अधिकच अरुंद होतो. यामुळे वाहनचाललकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.