नाशिक : गेल्या काही दिवसांपासून आसारामबापू पुलानजीक दिसणारे हिरव्या गोदापात्राचे रूप बदलले असून, आता याठिकाणी पाणवेली हटल्याने पुन्हा गोदापात्र दिसू लागले आहे.महापालिकेचे दुर्लक्ष झाले की गोदापात्रातील प्रदूषण वाढते आणि पाणवेली पसरतात. हा नेहमीचाच प्रकार आहे. गेल्या दोन वर्षांत गोदापात्रात पाणवेली दिसल्या नाहीत, परंतु आता काही दिवसांपासून पुन्हा पाणवेली पसरल्या आणि नदीपात्रातील पाणी दिसणेच दुर्मिळ झाले. त्यामुळे नगरसेवक विक्रांत मते यांनी दक्षता अभियानाच्या माध्यमातून मोहीम हाती घेतली आणि गोदापात्र स्वच्छ केले. नगरसेवक मते यांनी गोदापात्र स्वच्छतेसाठी यापूर्वीच पाण्यावरील घंटागाडी प्रकल्प राबविला होता. त्यासाठी महापालिकेने त्याला ठेकाही दिला होता. त्यामुळे गोदापात्र स्वच्छ राहण्यास मदत झाली होती, परंतु डिसेंबर महिन्यात ही मुदत संपताच गोदापात्राकडे पुन्हा दुर्लक्ष झाले आणि पाणवेली पसरल्या. त्याविषयी ओरड होत असतानाच मते यांनी त्यांच्या दक्षता अभियान या संस्थेच्या माध्यमातून गोदापात्र स्वच्छतेसाठी मोहीम राबविली आणि आनंदवल्ली ते होळकर पुलादरम्यान गोदापात्र स्वच्छ केले. त्यामुळे गोदापात्रावरील हिरवळ हटून हे पात्र दिसू लागले. दरम्यान, महापालिकेने याकडे लक्ष पुरवावे, असे आवाहन नगरसेवक विक्रांत मते यांनी केले आहे. (प्रतिनिधी)
हिरव्या गोदापात्राचे रूप बदलले
By admin | Published: February 20, 2015 1:36 AM