नाशिक : चौदा दिवसांच्या विलगीकरणानंतर जिल्हाधिकारी सूरज मांढरे हे शुक्रवारी (दि. १६) कार्यालयात हजर झाले. काेरोनानंतर कार्यालयातील कामकाजात पहिल्याच दिवशी त्यांनी व्हिडिओ कॉन्फरसिंगमध्ये सहभाग घेतला, तर दोन बैठकाही घेतल्या. गेल्या ३ जुलैला जिल्हाधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला होता. त्यानंतर ते वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार चौदा दिवस विलगीकरणात होते. या काळातही त्यांनी विलगीकरणातूनच कार्यालयाचे कामकाज पाहिले. आयपास प्रणालीच्या माध्यमातून त्यांनी दैनंदिन कार्यालयाचे कामकाज सुरूच ठेवले होते. व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातूनही त्यांचे काम सुरू होते. याचदरम्यान, विधिमंडळाच्या दोनदिवसीय अधिवेशनाच्या कामकाजासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून योगदान दिले. शुक्रवारी प्रत्यक्ष कार्यालयात हजर होत त्यांनी नियमितपणे कामकाज सुरू केले.
दरम्यान, विलगीकरणाच्या काळात आपण बरेच काही शिकलो असे मांढरे यांनी सोशल मीडियावरील आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. काेरोनाची लागण झाल्याचे लागलीच समजल्यास त्यावर मात सहज करता येते, मन खंबीर असेल तर शरीरही साथ देते याचा अनुभव या काळात आला. सकारात्मक विचार तुमची ऊर्जा वाढवतात असे मांढरे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.