नाशिक : हनुमानवाडी कॉर्नरवरील भेळभत्ता विक्रेता सुनील वाघ खून प्रकरणात मोक्कान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेले संशयित श्रीनिवास कानडे, पवन कातकाडे व अजय बागुल या तिघांचाही जामीन अर्ज जिल्हा सरकारी वकील अजय मिसर यांच्या प्रभावी युक्तिवादानंतर जिल्हा व सत्र न्यायाधीश उर्मिला फलके - जोशी यांनी बुधवारी (दि़२१) फेटाळला़ २७ मे २०१६ रोजी हनुमानवाडी परिसरात कुविख्यात परदेशी टोळीने वाघ याचा खून केल्याची घटना घडली होती़ दरम्यान, या खटल्यातील फिर्यादींनी प्रधान जिल्हा न्यायाधीशांकडे केलेल्या विनंतीनुसार या खटल्याची सुनावणी जोशी यांच्याच न्यायालयात होणार आहे़पोलिसांनी परदेशी टोळीवर मोक्कान्वये कारवाई केली, मात्र पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) यांनी परवानगी नाकारल्याने मोक्का हटला़ यामुळे संशयित कानडे, कातकाडे व बागुल यांनी जामिनासाठी अर्ज केला होता़ जिल्हा सरकारी वकील मिसर यांनी न्यायालयात युक्तिवादात सांगितले की, संशयित पवन कातकाडे याचे फिर्यादीत नाव नसले तरी खून केल्याची त्यास माहिती होती़ तसेच त्याने खोटे सांगून संशयितांना लपून राहण्यासाठी फ्लॅट उपलब्ध करून दिला व याच घरातून पोलिसांनी आरोपींचे रक्ताळलेले कपडे जप्त केले़ अजय बागुलचा प्रत्यक्ष खुनात सहभाग नसल्याबाबत मिसर यांनी सांगितले की, सराईत गुन्हेगार कुंदन परदेशी व बागुल एकमेकांच्या संपर्कात असल्याचे पुरावे आहेत़ तसेच वाघचा खून होण्यापूर्वी न घाबरण्याचा सल्लाही दिला होता़ तसेच खुनाच्या घटनेनंतर संशयितांना आर्थिक मदतीबरोबरच कातकाडे याच्या संपर्कातही होता़ परिसरात लावण्यात आलेले प्रेरणास्थानचे फलक, गुन्ह्यास चिथावणी व मदत केल्याचे पुरावे असल्याचे सांगितले़ तर वाघच्या खुनानंतर श्रीनिवास कानडे यास आरोपींनी कारमधून पळवून नेत असताना अटक करण्यात आली होती़
वाघ खून प्रकरणातील संशयितांचा अर्ज फेटाळला
By admin | Published: December 22, 2016 12:17 AM