येवला : जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी दोन्ही टप्प्यांमधील निवडणुकांमध्ये आपले नशीब आजमावू पाहणाऱ्या इच्छुक उमेदवारांना राज्य निवडणूक आयोगाने दिलासा देत नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या मुदतीत येणाऱ्या रविवारीदेखील उमेदवारी अर्ज दाखल करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. यामुळे आता दोन्ही टप्प्यांतील निवडणुकीत उमेदवारांना सलग सहा दिवस उमेदवारी अर्ज सकाळी ११ ते ३ यावेळेत दाखल करण्याची संधी मिळाली आहे. राज्य निवडणूक आयोगाने ११ जानेवारीला राज्यातील २५ जिल्हापरिषदा आणि २८३ पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्र म जाहीर केला होता. पहिल्या टप्प्यातील १५ जिल्हा परिषदा आणि १६५ पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याचा कालावधी शुक्र वार २७ जानेवारी ते बुधवार १ फेब्रुवारी असून यामध्ये २९ जानेवारी रविवार सार्वजनिक सुटीचा दिवस आहे.तर दुसऱ्या टप्प्यातील ११ जिल्हापरिषदा आणि ११८ पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याचा कालावधीत ५ फेब्रुवारीला रविवार आहे. या दोन्ही रविवारी यापूर्वीच्या आदेशात रविवारी उमेदवारी अर्ज दाखल करता येणार नाही असे म्हटले होते. याशिवाय निवडणुकात नामनिर्देशन पत्रासोबतची शपथपत्रे संगणक प्रणालीवर भरण्यासाठी अडचण येवू नये म्हणून निवडणूक निर्णय अधिकारी यांनी मदत कक्ष स्थापन करावा. सायबर कॅफे, सी.एफ.सी.ची मदत घ्यावी. शिवाय राजकीय पक्षांच्या लोकांना प्रशिक्षण देण्याच्या सूचनाही राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशात करण्यात आल्या आहेत.(वार्ताहर )
रविवारीही अर्ज दाखल करता येणार
By admin | Published: January 26, 2017 12:39 AM