नाशिक : शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी जिल्ह्यातील ४५० शाळांनी नोंदणी केली या शाळांमधील ४ हजार ५४४ जागांवर पात्र विद्यार्थ्यांच्या प्रवेशसाठी ३ ते २१ मार्चपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे.
आरटीई अंतर्गत मागील वर्षाच्या तुलनेत तीन शाळांची वाढ झाली असली तरी आर्थिक दुर्बल व मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राखीव २५ टक्के जागांमध्ये मात्र १ हजार १३ जागांनी घट झाली आहे. शैक्षणिक वर्ष २०२१ व २०२२ या वर्षाकरिता आरटीई प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली असून जिल्ह्यात ४ हजार ५४४ शाळांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आरटीई प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार बुधवार (दि. ३) ते रविवार (दि. २१) मार्च या कालावधीत पालकांना ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे.
इन्फो-
आवश्यक कागदपत्र
आरटीई प्रवेश प्रक्रियेत लॉटरीच्या माध्यमातून ज्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळेल, त्यांच्या प्रवेशासाठी रहिवासाचा पत्ता असणारा पुरावा, जन्माचा दाखला, बालक वंचित घटकातील असल्यास जातीची नोंद करण्यासाठी जातीचे प्रमाणपत्र, बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास उत्पन्नाचा दाखला आदी कागदपत्रे गटशिक्षणाधिकारी स्तरावर निर्माण केलेल्या पडताळणी समितीकडे सादर करणे आवश्यक असेल. लॉटरीत नाव आल्यास ही सर्व कागदपत्र पडताळणी समितीकडे सादर करावी लागणार आहे.