नाशिक : महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदाची निवडणूक येत्या मंगळवारी (दि.८) होणार असून, त्यासाठी सोमवारी (दि.८) अर्ज दाखल करण्यात येणार आहे. विरोधकांनी अगोदरच हाराकिरी पत्करल्याने भाजपाकडून एकमेव अर्ज दाखल होणार आहे. त्यासाठी माजी सभापती गणेश गीते यांचेच नाव आघाडीवर आहे. महापालिकेच्या कारभारात आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या स्थायी समितीला ताब्यात घेण्यासाठी शिवसेनने सुरुवातीला जोरदार तयारी केल्याचे भासवले आणि भाजपचे बळही कमी केले, परंतु नंतर मात्र सेनेचे ताबूत थंडावले. घोडेबाजार टाळण्यासाठी शिवसेनेने तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळेच काँग्रेस, राष्ट्रवादीनेही नाद सोडला. मनसेचे सलीम शेख अगोदरच भाजपाच्या गोटात सामील झाले आहेत. त्यामुळे भाजप-मनसेचे संख्याबळ नऊ झाले आहे. विरोधकांचे सात सदस्य असले, तरी सेनेने तटस्थ राहण्याचा निर्णय घेऊन सर्वांनाच धक्का दिला. त्यामुळे भाजपच्या विजयाचा मार्ग सुकर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, भाजपकडून अधिकृत उमेदवारी सोमवारी (दि.८) सकाळी जाहीर करण्यात येणार असल्याचे गटनेता जगदीश पाटील यांनी सांगितले.
स्थायी समितीसाठी आज अर्ज दाखल होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2021 1:28 AM