नाशिक : कोरोनामुळे शहरी भागातील उद्योग धंदे तसेच बांधकाम क्षेत्रही पुर्ण बंद असल्याने गावाकडे परतलेल्या मजुरांना आता रोजगार हमी योजनेची कामे वरदान ठरली असून, जिल्ह्यात मे महिन्यात सुमारे वीस हजार मजुर रोजगार हमी योजनेच्या कामावर रूजू झाले आहेत. या कामांसाठी जिल्हा परिषदेने सर्वच ग्रामपंचायतींना आदेश देवून सार्वजनिक कामे नसतील तरी मजुरांना शेतीची कामे करण्यास प्रोत्साहन देण्याच्या सुचना दिल्या आहेत.कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागताच केंद्र व राज्य सरकारने २२ मार्चपासून लॉकडाऊन व संचारबंदी जारी केली असून, त्यामुळे लहान, मोठे उद्योगधंदे तसेच बांधकाम क्षेत्र पुर्णपणे बंद पडले आहेत. ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध नसल्याने गेल्या अनेक वर्षांपासून शहरी भागात रोजगारासाठी स्थलांतरित केलेल्या मजुरांची त्यामुळे उपासमार होत असल्याचे पाहून अवघ्या आठवडभरातच या मजुरांनी मूळ गावी परतण्याचा निर्णय घेतला. नाशिक शहरात पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, हरसूल, इगतपुरी, कळवण या आदिवासी भागातील हजारो मजुर पोटापाण्यासाठी दरवर्षी येत असतात. शहरात मिळेल त्या ठिकाणी राहायचे व किंवा बांधकाम साईटवर काम सुरू असे पर्यंत आसरा ते घेत असत. परंतु आता कामेच बंद झाल्याने दोन वेळच्या पोटापाण्याचा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिल्याने हजारो मजूर मूळ गावी परतले. परंतु गावाकडे देखील या मजुरांवर उपासमारीची वेळ असून, त्यांच्या हाताला काम मिळण्याची शाश्वती राहिलेली नाही.ग्रामीण भागात शेतीच्या कामांशिवाय अन्य पर्याय नसला तरी, लॉकडाउनमुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाला पाहिजे त्याप्रमाणात भाव मिळत नाही. तसेच मजुरांना रोजगार देण्यासाठीही पैसे नसल्याने शेतकऱ्यांनी शेतातील उभी पिकांमध्ये जनावरे सोडून दिली आहेत. अशा परिस्थितीत गावाकडे पोट भरण्यासाठी गेलेल्या मजुरांवर दुहेरी संकट कोसळले आहे. ही बाब शासनाच्याही निदर्शनास आल्याने त्यांनी अशा मजुरांना महात्मा गांधी रोजगार हमी योजनेची कामे सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार नाशिक जिल्हा परिषदेनेने रोहयो कामांचा आराखडा तयार केला असून, मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड यांनी मजुरांना त्यांच्या गावातच रोजगार हमी योजनेची कामे उपलब्ध करून देण्याच्या सुचना ग्रामपंचायतींना दिल्या आहेत. त्यात विशेष करून स्वत:च्या शेतात काम करणाया मजुरालाही दिवसाचा रोजगार दिला जात असून, या शिवाय तलावातील गाळ काढणे, वृक्षारोपणासाठी खड्डे खणणे, नालाबंडींग, पाणी अडविण्यासाठी बांध घालण्याच्या कामांना प्राधान्य आहे. जिल्ह्यात सध्या ३६९१ कामे सुरू असून, १९३४४ मजुर सध्या कामावर आहेत. सध्या उन्हाळा सुरू असल्यामुळे मजुरांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता लक्षात घेता ४२६५ कामे सेल्फवर ठेवण्यात आली आहेत.
वीस हजार मजुर रोजगार हमी योजनेच्या कामावर रूजू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2020 5:55 PM
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागताच केंद्र व राज्य सरकारने २२ मार्चपासून लॉकडाऊन व संचारबंदी जारी केली असून, त्यामुळे लहान, मोठे उद्योगधंदे तसेच बांधकाम क्षेत्र पुर्णपणे बंद पडले आहेत
ठळक मुद्देबांधकाम क्षेत्र पुर्णपणे बंद पडले आहेत. ४२६५ कामे सेल्फवर ठेवण्यात आली आहेत