पेठ : शालेय पोषण आहार योजनेतंर्गत देण्यात येणाऱ्या मध्यान्ह भोजन योजनेमुळे शिक्षकांवर अतिरिक्त व अशैक्षणिक कामाचा बोजा पडत असून शासनाने शासकिय आश्रमशाळांप्रमाणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये देखील सेंट्रल किचन योजना राबवावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष अंबादास वाजे यांनी केली आहे.प्राथमिक शिक्षक संघाच्या जिल्हा महामंडळाची सभा राजाराम खैरनार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. शालेय पोषण आहार योजनेमुळे तांदुळ व धान्यादी मालाचा हिशेब व ताळमेळ ठेवणे, पोषण आहार वाटप करणे, किराणा साहित्य मोजून ताब्यात घेणे, दैनंदिन नोंदी ठेवणे, शासनाला विविध प्रकारचे अहवाल पाठवणे, जमा खर्चाच्या नोंदी ठेवणे अशा प्रकारची अनेक अशैक्षणिक कामे शिक्षकांना करावी लागतात. यातही काही अनियमितता झाल्यास अधिकारी वर्गाकडून थेट निलंबनाची कारवाई केली जात असल्याने प्राथमिक शिक्षक प्रचंड तणावाखाली काम करतांना दिसून येत आहेत. त्यामुळे शासनाने सेंट्रल किचन योजना सुरू करावी अशी मागणी बैठकीत करण्यात आली.शिक्षकांचे वेतन १ तारखेला व्हावे, सातवा वेतन आयोग एकस्तर नुसार देण्यात यावा, चट्टोपाध्याय वेतनश्रेणी लागू करावी,जुनी पेन्शन लागू करावी यासह प्राथमिक शिक्षक संघाच्या जिल्हा व तालुका अधिवेशन संदर्भात चर्चा करण्यात आली. याप्रसंगी राज्य कार्याध्यक्ष अंबादास वाजे, जिल्हाध्यक्ष राजाराम खैरनार, अर्जून ताकाटे, विनायक ठोंबरे, बाजीराव सोनवणे, संजय शेवाळे, प्रदिप शिंदे, सोमनाथ तेल्लूरे, निवृत्तीआहेर, धनंजय आहेर , मिलिंद गांगुर्डे, यांचेसह राज्य, जिल्हा व तालुका कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते. निंबा बोरसे यांनी आभार मानले.
प्राथमिक शाळांमध्ये सेंट्रल किचन योजना राबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2019 3:58 PM
शिक्षक संघ : महामंडळाच्या सभेत झाली चर्चा
ठळक मुद्देअनियमितता झाल्यास अधिकारी वर्गाकडून थेट निलंबनाची कारवाई केली जात असल्याने प्राथमिक शिक्षक प्रचंड तणावाखाली