नाशिक : खासगी वैद्यकीय महाविद्यालये आणि अभिमत विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातील प्रवेशाबाबत विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाची स्थिती असतानाच विद्यार्थ्यांना घाईतच अर्ज दाखल करावे लागले. अर्ज दाखल करण्याची सूचना २० रोजी प्रसिद्ध करण्यात आली, तर २४ तारीख अंतिम असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थी वंचित राहिले असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, राज्याबाहेरील विद्यार्थ्यांना खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेशासाठी आणखी महिनाभर वाट पहावी लागणार आहे. न्यायालयाच्या आदेशान्वये खासगीसह अभिमत विद्यापीठांची प्रवेशप्रक्रिया वैद्यकीय शिक्षण संचालनालयाच्या वतीने राबविण्यात आली. शासनाने अभिमत आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयांसाठी स्वतंत्र संकेतस्थळावर अर्ज उपलब्ध असतील, अशी माहिती प्रारंभी दिली होती. प्रत्यक्षात प्रवेशप्रक्रिया सुरू होईपर्यंत विद्यार्थ्यांना संकेतस्थळांची माहिती उपलब्ध होऊ शकली नव्हती. अर्ज दाखल करण्याच्या एकदिवस अगोदर म्हणजे १९ रोजी वैद्यकीय शिक्षण संचालनालयाच्या संकेतस्थळावर मात्र अभिमत आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रवेश अर्ज अपलोड करण्यात आले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांची धावपळ झाली. शिवाय ‘नीट’च्या आधारे राज्यातील मुले प्रथमच अर्ज दाखल करीत असल्याने गुणवत्ता यादीचे निकष काय असतील याबाबतही विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाची स्थिती कायम आहे. विशेष म्हणजे अभिमत विद्यापीठाचे अर्ज दाखल करण्यासाठी अनेक अडचणी आल्या असताना त्याचे निरसन करण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे. नीट परीक्षेतील गुणांच्या आधारे खासगी आणि अभिमत विद्यापीठातील एमबीबीएस आणि बीडीएससाठी विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. परंतु गुणवत्ता यादी बनविताना खासगी वैद्यकीय महाविद्यालयांचे निकष आणि अभिमतसाठीचे निकष काय असतील याबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था आहे. नीटद्वारे प्रथमच प्रवेश दिले जाणार असल्याने महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना खासगी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश दिले जाणार आहेत. मात्र राज्य आणि सीबीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी कसे निकष लावले जाणार याचीही स्पष्टता नसल्याने गोंधळाची परिस्थिती कायम आहे.
वैद्यकीय प्रवेशासाठी गोंधळातच अर्ज दाखल
By admin | Published: August 26, 2016 12:23 AM