नांदगाव : तहसीलदारपदी अवघ्या वर्षभरात चार परिवीक्षाधीन तहसीलदारांची नियुक्ती केल्याने नांदगाव तालुक्याची प्रयोगशाळा केली आहे का, असा सवाल उपस्थित केला जाऊ लागला आहे.गेल्या वर्षभरात स्थायी तहसीलदार नसल्याने सर्वसामान्य जनतेची कामे रखडत असल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपाने संतापाला मोकळी वाट करून दिल्याने आज तहसीलदारपदाची प्रभारी सूत्रे स्वीकारणाऱ्या रचना पवार यांना पहिल्याच दिवशी सत्ताधारी भाजपाच्या हल्लाबोलला सामोरे जाण्याची वेळ आली. भाजपा कार्यकर्त्यांनी तहसीलमधील दलालांना वेसण घालण्याची मागणी केली आहे.प्रशासनाने सारवासारव करत २० आॅक्टोबर २०१५ रोजी सुशील बेल्हेकर या परिवीक्षाधीन तहसीलदाराकडे नांदगावचा कारभार सोपविला. सुशील बेल्हेकर परिवीक्षाधीन तहसीलदार असल्याने आता त्यांना पुढे नांदगावला कार्यरत करण्याऐवजी त्यांची २ डिसेंबर २०१५ रोजी जामखेडला बदली करण्यात आली. त्यानंतर अनिल गवांदे या परिवीक्षाधीन तहसीलदाराची नियुक्ती करण्यात आली. गवांदे यांची निर्णयक्षमता नेहमीच भोवऱ्यात सापडली. ते योग्य अथवा अयोग्य असा कोणत्याही प्रकारचा निर्णय घेत नसल्याची ओरड होती. त्यांना रजेवर पाठविण्यात आले आहे व आजपासून पुन्हा परिवीक्षाधीन तहसीलदार रचना पवार यांची प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. श्रीमती पवार यांचा परिवीक्षाधीनतेचा कालावधी जानेवारी २०१७ पर्यंत असला तरी त्यांना नायब तहसीलदारपदाचा बावीस आठवड्यांसाठी म्हणजे ३ जून ते २१ आॅगस्ट २०१६ पर्यंतचा प्रशिक्षण कालावधी देण्यात आला आहे. त्यानंतर जानेवारी २०१७ पर्यंत परिवीक्षाधीन तहसीलदार म्हणून काम करायचे असल्यास त्याबाबत अद्याप स्पष्टता व्हायची आहे. त्यामुळे एवढ्या कमी कालावधीत आधीच निर्माण झालेल्या दफ्तरदिरंगाईचे व एजंटांचे आव्हान श्रीमती पवार यांना पेलावे लागणार आहे. (वार्ताहर)सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हादेवळा : पंचायत समितीतील लिपिक सुनील सूर्यवंशी व स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे दिनेश अहिरे यांच्यात गेल्या आठवड्यात झालेल्या वादात परस्परांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. मागील आठवड्यात दोघांत वाद निर्माण झाला. एकमेकांत शिविगाळीचा प्रकार झाल्याने सूर्यवंशी यांनी देवळा पोलिसांत सरकारी कामात अडथळा आणल्या-बाबत अहिरे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला, तर दिनेश अहिरे यांनी सूर्यवंशी यांनी जातिवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप केला. (वार्ताहर)
वर्षभरात चार परिवीक्षाधीन तहसीलदारांची नियुक्ती
By admin | Published: June 15, 2016 10:02 PM