नाशिक : शहरातील महापालिकेच्या मालकीचे मोकळे भूखंड पीपीपी तत्त्वावर विकसित करण्याकरिता कन्सल्टंट नेमण्याच्या आयुक्तांच्या प्रस्तावाला स्थायी समितीने विनाचर्चा तत्काळ मंजुरी दिली आहे. त्यामुळे महापालिकेच्या विविध सल्लागारांमध्ये आणखी एकाची भर पडणार आहे.शहरातील महत्त्वाचे भूखंड पीपीपीद्वारे विकसित करण्याचे महापालिकेने प्रस्तावित केलेले आहे. त्यासंदर्भात महासभा आणि स्थायी समितीच्या अंदाजपत्रकातही सूचित करण्यात आलेले आहे. त्याचाच आधार घेत आयुक्तांनी सदर भूखंड पीपीपीद्वारे विकसित करण्यासाठी कन्सल्टंट नेमण्याचा प्रस्ताव स्थायी समितीवर ठेवला होता. पीपीपी कन्सल्टंटसाठी महापालिकेने आॅफर्स मागविल्या होत्या. त्यासाठी विविध प्रांतातून पाच एजन्सींनी प्रतिसाद दिला होता. नियुक्त होणाºया सल्लागाराला २५ कोटी रुपयांच्या प्रकल्पांतर्गत ०.७५ टक्के, २५ ते ५० कोटी रुपयांच्या प्रकल्पांसाठी ०.६० टक्के, ५० ते ७५ कोटी रुपयांच्या प्रकल्पांसाठी ०.५० टक्के, ७५ ते १०० कोटी रुपयांच्या प्रकल्पांसाठी ०.४० टक्के, तर १०० कोटी रुपयांवरील प्रकल्पांसाठी ०.२५ टक्के फी मोजली जाणार आहे. शिवाय, महापालिकेने तीन सल्लागारांचे मिळून एक पॅनल तयार करण्याच्या दृष्टीनेही तयारी चालविली आहे. पीपीपी कन्सल्टंट नेमल्यानंतर त्यानेच टेंडर प्रक्रिया राबवून एजन्सी अंतिम करावयाची आहे. त्यासाठी महापालिकेकडून प्रकल्प किमतीनुसार फी मोजली जाणार असून, प्रकल्प यशस्वी झाल्यास विकासकाकडूनही सल्लागाराला फी मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
मोकळे भूखंड विकसित करण्यासाठी सल्लागार नियुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2017 4:28 PM