येवला : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विशेष निमंत्रित तज्ज्ञ संचालकपदी साहेबराव सैद पाटील व एकनाथ साताळकर या दोघांची सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाने नियुक्ती निवड जाहीर केली. दरम्यान, राष्ट्रवादीचे वर्चस्व असलेल्या या बाजार समितीमध्ये या दोन सदस्यांमुळे भाजपा-सेनेचे संचालक वाढले आहे.कृषी उत्पन्न बाजार समितीची जुलै महिन्यात निवडणूक झाली. तेव्हापासून तज्ज्ञ संचालकपदी कोणाची वर्णी लागते याकडे लक्ष लागून होते. पाच कोटीपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीत दोन विशेष निमंत्रित तज्ज्ञ संचालक नेमण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. सहकार, पणन व वस्रोद्योग विभागाचे कार्यासन अधिकारी य. गं. पाटील यांच्या आदेशानुसार सैद पाटील व साताळकर या दोन सक्रिय पदाधिकाऱ्यांची वर्णी लागली आहे. सैद पाटील हे जलसंपदा विभागातील सेवानिवृत्त उपविभागीय अभियंता असून, सद्या ते जिल्हा दक्षता व संनियंत्रण समितीचे सदस्यदेखील आहे. तर साताळकर हे भाजपाचे तालुकाध्यक्ष आहेत. त्यांना काम करण्याची संधी मिळाल्याने माजी आमदार मारोतराव पवार, जिल्हा बँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे, संचालक किशोर दराडे, संभाजी पवार, दिलीप मेंगळ, रतन बोरणारे, प्रमोद पाटील, राजेंद्र लोणारी, अरुण काळे, दिनेश आव्हाड, प्रमोद सस्कर, आनंद शिंदे, मनोज दिवटे आदिंनी त्यांचा सत्कार केला. (वार्ताहर)
बाजार समितीवर संचालकांची नियुक्ती
By admin | Published: February 09, 2016 10:55 PM