नाशिक- पेस्ट कंट्रोल सुरू असताना शॉर्टसर्किटमुळे अचानक नाशिक महापालिकेच्या शिवसेना गटनेता कार्यालयाजवळ लागलेली आग आटोक्यात आली आहे. अग्निशामक दलाच्या जवानांनी धावपळ केल्याने आग वेळीच आटोक्यात आली. दरम्यान या आगीची चौकशी करण्यात येईल त्यासाठी आयुक्तांनी चौकशी समितीही नियुक्त केली आहे, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.
महापालिकेच्या राजीव गांधी भवन मध्ये शिवसेना कार्यालय येथे पेस्ट कंट्रोलचे काम आज सकाळी दहा वाजता सुरू झाले त्यामुळे सर्व कर्मचारी आणि नगरसेवकांना या ठिकाणी येण्यास प्रतिबंध करण्यात आला होता. दरम्यान अकरा वाजेच्या सुमारास या ठिकाणी काम सुरु असताना इलेक्ट्रिक स्वीच बोर्डाने अचानक पेट घेतला त्यामुळे स्टोअर रूमला आग लागली सोफा पंखे आणि काही दस्तावेज जळून खाक झाले महापालिकेच्या अग्निशामक दलाने आज वेळीच आटोक्यात आणल्याने अनर्थ टळला. सुरक्षततेचा भाग म्हणून महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना राजीव गांधी बाहेर पाठवण्यात आले होते. त्याप्रमाणे सर्व संगणक व अन्य विद्युत साहित्य बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या या घटनेनंतर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत तसेच आमदार सुहास कांदे भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांनी घटनास्थळी भेट दिली राज्यातील सर्व महापालिकांच्या आणि नगरपालिकांच्या इमारतींचे फायर ऑडिट झाले आहे किंवा नाही यासंदर्भात नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करण्यात येईल असं उदय सामंत यांनी यावेळी सांगितलं.