युवा ख्याल संकीर्तनाचा प्रारंभ अनिल कुटे यांचे शिष्य समृद्ध कुटे यांच्या बासरी वादनाने झाला. त्यांनी राग, आलाप, जोड, झाला यातून विविध स्वराकृतींची मांडणी केली. त्याला अव्दय पवार यांनी केलेली तबला साथ विशेष उल्लेखनीय होती. आशिष रानडे यांच्या शिष्या हेमांगी कटारे यांनी राग मधुवंत सादर केला. विलंबित एकतालात ‘पिया तोरे कारन’हा ख्याल तर द्रुत तीन तालात ‘माने माने ना’ ही बंदीश सादर केली. त्यांच्या उत्कृष्ट सादरीकरणाला रसिकांनी भरभरुन दाद दिली. गिरीष पांडे यांचे शिष्य कल्याण पांडे यांचे सोलो तबलावादन रंगले. त्यांनी ताल दीपचंदीमध्ये पेशकार, कायदा, रेला, तुकडे चक्रदार अत्यंत तयारीने सादर केले. त्यांना प्रतीक पंडित यांनी साथ दिली. देवश्री नवघरे यांच्या शिष्या गायत्री तांबे यांनी ‘राग मियाँ की तोडी’ मध्ये ‘अब मोरे रामका ख्याल’ ‘कांकरीया जी न मारो’ ही प्रसिद्ध बंदीश सादर केली. त्यांना व्यंकटेश तांबे यांनी तितकीच तोलामोलाची साथ दिली. तर दिवसाची सांगता पं. शंकर वैरागकर यांचे शिष्य आनंद अत्रे यांच्या गायनाने झाली. त्यांनी रागेश्री रागातील चीज सादर केली. विलंबित एकतालात बतीया न माने तर द्रुत तीन तालात आयो मतवारी सावरो’ ही बंदीश अत्यंत तयारीने सादर केली. आलाप, सरगम, लक्षवेधी तान याद्वारे मैफल श्रवणीय केली. सुजीत काळे यांनी सुरेल तबला साथ दिली. सर्व कार्यक्रमात संवादिनी साथ तुषार सोनवणे, संस्कार जानोरकर यांनी केली.
रविवारी होणाऱ्या कार्यक्रमातही युवा कलाकार त्यांच्या कलांचे सादरीकरण करणार आहेत.फोटो (१२युवा)
युवा ख्याल संकीर्तन कार्यक्रमात बासरीवादन करताना समृद्ध कुटे समवेत तबल्यावर अद्वय पवार.