नाशिक : महाराष्ट स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेची ताकद ही राजकीय उलथापालथ करणारी ठरू शकते. राज्यात कामगार संघटनेची मोठी ताकद आहे. वेतनाच्या मुद्द्याने कामगारांवर अन्याय होणार असेल तर कामगारांना आपली ताकद दाखवून देण्याची वेळ आली आहे. वेतनाबाबत योग्य तो तोडगा निघाला नाही, तर प्रसंगी एस.टी. कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे गा-हाणे मांडण्याचा निर्णय घेण्यात येऊन संपाच्या ठरावाला सर्वसाधारण सभेत एकमुखाने मंजुरी देण्यात आली. एस. टी. कामगार संघटनेची सर्वसाधारण सभा भाभानगर येथील गायकवाड सभागृहात आयोजित करण्यात आली होती. यावेळी संघटनेचे जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे यांनी कार्यकारिणीतील ठराव सभागृहापुढे मांडले. वरिष्ठ वेतनश्रेणीतील त्रुटी दूर करणे, कर्मचाºयांवरील कारवाई मागे घेणे आणि कायदेशीर चौकटीत राहून संप करण्याचा ठराव यावेळी मांडण्यात आला. यावेळी सभेने या ठरावांना सर्वानुमते मंजुरी दिली. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर कामगार संघटनेचे राज्याध्यक्ष संदीप शिंदे, सदाशिव शिवणकर, अनिल श्रावणे, प्रमोद भालेकर, विजय पवार, स्वप्नील गडकरी, शिला नाईकवाडे, बाबाजी बच्छाव, शिवाजी देशमुख, सुरेश बावा आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी ताटे यांनी कायदेशीर चौकटीत राहून संपाचा हक्क बजाविण्याबाबत आवाहन केले. यावेळी संप करताना कामगारांवरील अन्यायाचे गाºहाणे लोकप्रतिनिधींसमोर मांडण्याचाही निर्णय घेण्यात आला. त्यानुसार जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी आपल्या आमदारांच्या निवास्थानी जाऊन कामगारांची भूमिका मांडण्याचा निर्णयही घेण्यात आला. संप काळात कर्मचाºयांवर करण्यात आलेल्या कारवाईला संघटना अजूनही न्यायालयात लढा देत आहे. यापुढील काळात संपाची पूर्वतयारी, मंजुरी करण्यात येऊन कायदेशीर संप पुकारण्याचे जाहीर केले. याच पद्धतीने मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत निवेदने पोहचवून बाजू मांडली जाईल, असेही ताटे यांनी जाहीर केले. या राज्यस्तरीय सर्वसाधारण सभेसाठी राज्यभरातील कामगार संघटनेचे नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रत्येक जिल्हानिहाय आढावा यावेळी घेण्यात आला.
महाराष्ट स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संपाच्या ठरावाला मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2018 1:15 AM