इगतपुरी : नगर परिषद हद्दीतील सर्व नागरिकांचे लक्ष वेधून असलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेची अंमलबजावणीसाठी नगर परिषद प्रशासन सर्व्हे करणार असल्याची माहिती मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार मुंढे यांनी सर्वसाधारण बैठकीत दिली. त्यास सर्व नगरसेवकांनीही मंजुरी दिल्याने शहरातील सर्वसामान्य नागरिकांनी समाधान व्यक्त केले.नवनिर्वाचित नगराध्यक्ष नीलिमा सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली नगर परिषदेच्या पहिल्या सर्वसाधारण बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी उपनगराध्यक्ष शशिकांत उबाळे उपस्थित होते. बैठकीत बारा विषय ठेवण्यात आले होते. त्यात प्रामुख्याने प्रधानमंत्री आवास योजनेची अंमलबजावणीबाबतच्या निर्णयावर सर्वानुमते मंजुरी देण्यात आली असून, नगर परिषद प्रशासन शहरात सर्व्हे करण्यासाठी खास एजन्सी नेमणार असून, सर्वसाधारण नागरिकांसाठी म्हाडाअंतर्गत परवडणारी घरे याचा पाठपुरावा करणार आहे.तसेच नगरपालिकेला उत्पन्नवाढीसाठी दैनंदिन व आठवडे बाजार वसुलीचा वार्षिक मक्ता देणेकामी निर्णय घेण्यात आला. साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे वाचनालयातील मौलाना अब्दुल कलाम आझाद हॉलमध्ये होणाऱ्या लग्नसमारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम आदिसाठी भाडेवाढीचा निर्णय घेण्यात आला. शहरात स्वच्छता राहण्यासाठी सफाई कामगार, घंटागाडी नियमित करण्याची सूचना नगरपालिका प्रशासनास दिली. यासह अनेक विषयांना यावेळी मंजुरी देण्यात आली.या सर्वसाधारण सभेस उपनगराध्याक्ष शशिकांत उबाळे, माजी नगराध्यक्ष जनाबाई खातळे, संजय इंदूलकर, नगरसेवक यशवंत दळवी, सुनील रोकडे, ज्ञानेश शिरोळे, सतीश करपे, नईम खान, धनंजय पवार, नरेंद्र कुमरे, संगीता वारघडे, प्रमिला भोंडवे, रुख्मिणी डावखर, रत्नमाला जाधव, अलका चौधरी यांच्यासह नगरपालिकेचे रणधीर, इंजिनिअर यशवंत ताठे, जे.आर. शहा, रफीक शेख, हिरामण कोरडे आदि उपस्थित होते. (वार्ताहर)
प्रधानमंत्री आवास योजनेस मंजुरी
By admin | Published: March 11, 2017 1:06 AM