सिन्नर तालुक्यातील शहा,वडांगळी, खडांगळी व खोपडी बुद्रुक येथील गाव तलाव व बंधाऱ्यांची गळती मोठ्या प्रमाणावर होत होती. ही गोष्ट संबंधित गावातील शेतकर्यांनी आमदार कोकाटे यांच्याकडे मांडून बंधाऱ्यांची तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी केली होती. कोकाटे यांनी जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांना दुरुस्तीचे प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार जलसंधारण विभाग नाशिक यांनी सदर बंधाऱ्यांच्या दुरुस्तीचे प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे सादर केले होते.या बंधाऱ्याच्या दुरुस्तीच्या प्रस्तावांना नुकतीच मंजुरी मिळाली आहे. यामुळे या चारही गावातील सिंचनामध्ये वाढ होणार आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांच्या पीक पद्धतीतही बदल होणार आहे. शहा येथील बंधाऱ्यास २२ लाख ५९ हजार ,वडांगळी येथील बंधाऱ्यास २७ लाख २६ हजार रुपये, खडांगळी येथील बंधाऱ्यास २२ लाख ६५ हजार रुपये तर खोपडी बुद्रुक येथील बंधाऱ्यास १९ लाख ४५ हजार रुपये इतका निधी दुरुस्तीसाठी मंजूर झाला आहे.
इन्फो
सिंचन क्षेत्रात वाढ होणार...
वडांगळी येथील कासार नाल्यावरील बंधारा गेल्या अनेक वर्षापासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत होता.मात्र दुरुस्ती वेळेवर होत नसल्याने या बंधाऱ्यातील पाणी वाहून जात होते. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात येथील शेतकऱ्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असे. आता बंधारा दुरुस्तीसाठी निधी मंजूर झाल्याने शेतकऱ्यांचे सिंचन क्षेत्र वाढणार आहे.