नाशिक : बरीच भवति न भवति झाल्यानंतर अखेर ९४ व्या मराठी साहित्य संमेलनासाठी नाशिकच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे . अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या स्थळ पाहणी समितीने दिलेल्या अहवालाच्या आधारे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी नाशिकच्या नावाची घोषणा शुक्रवारी (दि.८) केली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचे साहित्य संमेलन घ्यावे की घेऊ नये, तसेच घेतले तर कुठे घ्यावे, नाशिक, दिल्ली, सेलू की अंमळनेर अशा विविध प्रश्न आणि समस्यांमधून पुढे जात, अखेर यंदाच्या साहित्य संमेलनासाठी नाशिकच्या गोखले एज्युकेशन कॅम्पस परिसराची निवड करण्यात आली आहे. साहित्य महामंडळाच्या स्थळ निवड समितीने गुरुवारी गोखले एज्युकेशनच्या कॅम्पसची पाहणी करून तसा अहवाल शुक्रवारी अध्यक्षांना दिला. स्थळ निवड समितीने परिसराची पाहणी केल्यानंतर देखील समाधान व्यक्त केले होते. त्यामुळे साहित्य संमेलनासाठी यंदा नाशिकचेच नाव निश्चित होणार याची चिन्हे दिसू लागली होती. नाशिकमध्ये यापूर्वी १९४२ आणि २००५ असे दोन वेळा साहित्य संमेलन पार पडले होते. दुसऱ्या साहित्य संमेलनासाठी नाशिककरांना तब्बल ६३ वर्ष वाट पहावी लागली होती. मात्र २००५ नंतर अवघ्या सोळा वर्षांनंतर यंदा मार्च महिन्याच्या १९,२० आणि २१ तारखेला होण्याची चिन्हे आहेत. मात्र, त्याबद्दल महामंडळाने अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही.यंदा होणारे नाशिकमधील हे तिसरे तर देशातील ९४ वे साहित्य संमेलन होणार आहे. यंदाचे साहित्य साहित्य संमेलन भरविण्यासाठी नाशिकच्या लोकहितवादी मंडळाने प्रस्ताव दिला होता. त्या प्रस्तावाला प्रतिसाद देत महामंडळाने अखेर नाशिकवर पसंतीची मोहोर उमटवली आहे. दरम्यान नाशिकला होणाऱ्या या तिसऱ्या साहित्य संमेलनासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या नावाची स्वागताध्यक्ष पदासाठी चर्चा आहे. शुक्रवारी भुजबळ यांना स्वागताध्यक्ष पद स्वीकारण्यासाठी त्यांना गळ घातली जाणार आहे. स्वागताध्यक्ष पदानंतर अन्य हालचालींना प्रारंभ होणार आहे.