सटाणा:निसर्गाशी संबधित पंचतत्वावर आधारित उपाययोजना करुन शाश्वत निसर्गपूरक जीवनपध्दती अवलंबिण्यासाठी शहरात पालिका प्रशासनातर्फे बुधवारपासून माझी वसुंधरा या अभियानास प्रारंभ करण्यात आला. शासनाने दिलेल्या निर्देशानुसार पालिका क्षेत्रात " माझी वसुंधराअभियान राबविण्यात येत आहे . अभियानाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी (दि. २३) शहरातील मोकळया जागा , उद्याने स्वच्छ करण्याकरिता विशेष मोहिम हाती घेण्यात आलेली आहे . निमित्ताने नदीपात्र स्वच्छ करण्याची देखील मोहिम हाती घेण्यात आली असून यात जास्तीत लोकसहभाग घ्यावा असे आवाहन प्रभारी नगराध्यक्ष राकेश खैरनार यांनी केले आहे . • याप्रसंगी प्रशासन अधिकारी विजय देवरे , स्वच्छता निरिक्षक .माणिक वानखेडे , स्थापत्य अभियंता चेतन विसपुते , ग्रंथपाल ज्ञानेश्वर खैरनार , वाहन विभाग प्रमुख .संदिप पवार , सहा.स्वच्छता निरिक्षक किशोर सोनवणे , दिपक सोनवणे , प्रमोद गहिवड , दिनेश कचवे , धनंजय सोनवणे , तसेच उद्यान विभागातील व स्वच्छता विभागातील कर्मचारी उपस्थित होते .---------------------काय आहे माझी वसुंधराअभियानस्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पृथ्वी , वायु , जल , अग्नि आणि आकाश या निर्सगाशी संबधीत पंचतत्वावर आधारीत " माझी वसुंधरा अभियान " दिनांक २ ऑक्टोबर , २०२० ते ३१ मार्च , २०२१ या कालावधीत राबविण्याबाबत निर्देश दिलेले आहेत . या अभियानाचा उद्देश निसर्गाशी असलेली कटिबध्दता निश्चित करण्यासाठी, निर्सगाशी संबधित पृथ्वी , वायु , जल , अग्नि आणि आकाश या पंचतत्वावर पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग कार्य करीत आहे . पृथ्वी तत्वाशी संबधित वनीकरण , वनसंवर्धन , घनकचरा व्यवस्थापन , सांडपाणी व्यवस्थापन व जमिनीकडे धुपीकरण इत्यादी बाबींवर कार्य करणे. वायू तत्वाचे संरक्षण करता यावे म्हणून हवेच्या गुणवत्तेसाठी वायूप्रदुषण कमी करुन हवेच्या गुणवत्तेत सुधारणा करणे. निर्सगाच्या या पंचतत्वासोबत जीवन पध्दती अंगिकारल्याशिवाय आपण निसर्गासोबत जगू शकणार नाही आणि जैव विविधतेचेही अस्तित्व राहणार नाही . म्हणून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना सोबत घेवून हे अभियान राबविण्यात येत आहे.
सटाण्यातील आरम नदीपात्रही होणार स्वच्छ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 1:43 PM