नाशिक : मोफत अंत्यसंस्कार योजनेंतर्गत अंत्यविधीचे साहित्य पुरवणाऱ्या ठेक्याबाबत कार्यादेश एकाला आणि बिले अदा करायची दुसऱ्याला, असा पेचात टाकणारा प्रस्ताव स्थायी समितीच्या विषय पटलावर आला. यावेळी सदस्यांनी आरोग्य विभागाच्या भोंगळ कारभारावर टीका करत चौकशीची मागणी केली. दरम्यान, दोन ठेकेदारांच्या वादात अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊ नये याकरिता संबंधित ठेकेदारांना सोबत बोलावून तोडगा काढण्याची सूचना स्थायी समितीचे सभापती सलीम शेख यांनी प्रशासनाला केली. नाशिक पूर्व विभागातील अमरधाममध्ये अत्ंयविधीच्या साहित्याचा ठेका घेण्यावरून मालपाणी विरुद्ध हिरवे असा दोन ठेकेदारांमधील वाद सुरू आहे. सदर वाद न्यायप्रवीष्ट आहे. दरम्यान, मोफत अंत्यसंस्कार योजनेअंतर्गत ठेकेदार रामचंद्र हिरवे यांच्याकडून काम करून घेण्यात आल्याने त्यांना ३७ लाख ५२ हजार रुपयांचे बिल अदा करण्याचा प्रस्ताव मान्यतेसाठी स्थायी समितीवर ठेवण्यात आला होता. यावेळी रंजना पवार यांनी सदर ठेक्याबाबत आरोग्य विभागाकडून चुकीचे कामकाज होत असल्याचा आरोप करत त्याबाबत सखोल चौकशीची मागणी केली. पवार यांनी आरोग्याधिकारी डॉ. डेकाटे यांना सदर ठेक्याबाबत काही प्रश्नही उपस्थित केले. निविदाप्रक्रियेनुसार सर्वांत न्यूनतम निविदाधारक मालपाणी असताना हिरवे यांना काम कसे देण्यात आले आणि मालपाणी यांना दोनदा कार्यादेश देऊनही त्यांना काम का दिले गेले नाही. या प्रश्नाला उत्तर देताना डेकाटे यांनी मालपाणी यांच्याकडे शॉप अॅक्ट लायसेन नसल्याचे स्पष्ट केले. परंतु प्रकाश लोंढे यांनी डेकाटे यांना धारेवर धरत अटी-शर्तीत मालपाणी बसत नव्हते तर त्यांना निविदा प्रक्रियेत सहभागी का करून घेतले, असा सवाल केला. त्यावर डेकाटे निरुत्तर झाले. दिनकर पाटील यांनी सातपूर, आनंदवली, गंगापूर परिसरात अंत्यविधीचे साहित्यच उपलब्ध होत नसल्याची तक्रार केली. आरोग्य विभागाच्या अनागोंदी कारभारावरही त्यांनी टीकास्त्र सोडले. (प्रतिनिधी)
अंत्यविधी साहित्याच्या ठेक्याचा वाद स्थायीत
By admin | Published: September 23, 2016 1:14 AM