नायगाव : वीज वितरण कंपनीच्या मनमानी कारभारामुळे शेतकºयांचा रब्बी हंगाम पाणी असूनही करपू लागला आहे. आठ तासांच्या वीजपुरवठ्यात ऐंशी वेळा खंडित होणाºया वीजपुरवठ्याला नायगाव खोºयातील शेतकरी वैतागले आहेत. शेकडो एकर कांदा लागवड पाण्या अभावी करपल्याने शेतकºयांचा संताप वाढला आहे.सध्या परिसरात मोठ्या प्रमाणात कांदा लागवड व गव्हाच्या पेरणीचे काम सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून नायगाव व परिसरात विशेषत: जायगाव व देशवंडी गावांमध्ये वीज वितरणाचे तीन तेरा वाजल्याने शेतकरी वर्गात कंपनीच्या कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे. परिसरात सध्या उन्हाळ कांद्याची लागवड सुरु आहे. देशवंडी व जायगाव शिवारात गेल्या दोन दिवसांपासुन शेतीसाठी आठ तास होणाºया वीज पुरवठ्यात सकाळी साडेआठ वाजेपासून दुपारी साडेचार वाजेपर्यंत पंधरा मिनिटांच्या अंतरावर वारंवार खंडित होणाºया वीजपुरवठ्यामुळे शेतात सुरु असलेल्या कांदा लागवड केलेल्या पिकास विहिरीत पाणी असूनही देता येत नसल्याने गेल्या दोन दिवसांमध्ये शेकडो एकर लागवड केलेला कांदा उन्हाच्या तीव्रतेने करपून गेल्याची भीती व्यक्त होत आहे. शासन शेतकºयांना थकीत बिल भरण्यासाठी कृषी संजिवनी योजना जाहीर करु न शेतकºयांकडून बिलाची रक्कम वसुली करत आहे.मात्र शेतीसाठी अखंडीत वीज देण्यासाठी कोणतेच पाऊल उचलत नसल्याचे शेतकरी सांगत आहे.सध्या पाणी भरतांना वाफ्यात पाणी आले की वीज गायब होत असल्याने पाणी भरणा-या शेतकºयांची तारांबळ होत असल्याने संताप व्यक्त होत आहे. दरम्यान आज सकाळपासून विजेचा खेळखंडोबा जास्तच वाढल्याने पाण्यावाचून कांदा करपू लागल्याने दोन्ही गावचे शेतकरी जायगाव येथे एकत्र येत वीज वितरणचे अधिकारी राजेंद्र महाजन यांना बोलावुन वारंवार खंडीत होणाºया वीजेच्या समस्या सोडवण्याची मागणी केली.यावेळी महाजन यांनी दोन दिवसात ही समस्या दूर करण्याचे आश्वासन दिले.
वीज वितरणची मनमानी : आठ तासांत होतो ८० वेळा वीजपुरवठा खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2017 1:17 AM