सरपंचपदासाठी ग्रामविकास पॅनलच्या अर्चना गीते तर उपसरपंचपदासाठी अलका काळे यांचे एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अनिल जऱ्हाड यांनी काम पाहिले. त्यांना ग्रामसेवक डी. पी. दहिफळे, भाऊसाहेब पिंपळे यांनी सहकार्य केले. यावेळी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब गीते, शशिकांत गीते, अर्चना आव्हाड उपस्थित होते. सात सदस्य संख्या असलेल्या आंबेगाव ग्रामपंचायतमध्ये ग्रामविकास पॅनल व परिवर्तन पॅनल यांच्यात सरळ लढत झाली होती. ग्रामविकास पॅनलला पाच तर परिवर्तन पॅनलला दोन जागा मिळाल्या आहेत. सरपंच, उपसरपंचपदासाठी निवडणूक बिनविरोध झाल्याचे जाहीर होताच ग्रामविकास पॅनलच्या नेते व कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करीत एकच जल्लोष केला. यावेळी माजी सरपंच आनंदा गीते, पुंडलिक सोनवणे, भीमाजी आव्हाड, पंडित गीते, अशोक गीते, नितीन काळे, लक्ष्मण आव्हाड, रतन सोनवणे, सोमनाथ सांगळे आदी उपस्थित होते.
(फोटो १३ आंबेगाव)