नाशिक : ओमायक्रॉन या नवीन व्हेरिएंटची धास्ती वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर जे नागरिक सुईच्या भीतीपोटी लसीकरणापासून दूर राहिले आहेत, त्यांच्यासाठी प्रायाेगिक तत्त्वावर ‘झायकोव्ह डी नीडल फ्री’ लस प्रथमच नाशिकसह जळगावला देण्यात येणार आहे. या पायलट प्रकल्पासाठी नाशिकची निवड झाली असून लसीकरणाचा साठा आल्यानंतर या सुईला घाबरणाऱ्या नागरिकांना ही विशेष लस देण्यात येणार आहे. हा प्रकल्प यशस्वी झाल्यास आणि लसीकरणाला घाबरून न घेणाऱ्या नागरिकांनी लस घेतल्यास त्याची अंमलबजावणी राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्ये करण्यात येणार आहे. झायकोव्हचे तीन डोस हे मशीनद्वारे त्वचेमधून दिले जाणार आहेत. ही नीडल फ्री लस पूर्णपणे प्रभावी व्हावी यासाठीच प्रत्येकी २८ दिवसांच्या अंतराने तीन डोस देण्यात येणार आहेत. त्वचेवर केवळ मशीन ठेवून कोणतीही टोचणी न करता त्या मशीनद्वारे लसमधील द्राव त्वचेतून आतमध्ये सोडले जातील, असे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी सांगितले.
इन्फो
तब्बल ८ लाख डोस
केंद्र शासनाने पायलट प्रोजेक्ट म्हणून नाशिक आणि जळगाव या दोन्ही जिल्ह्यांना प्रत्येकी ८ लाख डोस देण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिकप्रमाणचे जळगावच्या लसीकरणात वाढ करण्यासाठीदेखील त्यातून प्रयत्न केले जात आहेत. मात्र, या प्रकल्पाच्या यशावरच अन्य जिल्ह्यांमध्ये त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.