नाशिक : भारतीय सैन्यादलाचा कणा मानल्या जाणाऱ्या ‘कॅट्स’च्या तळावरून लढाऊ वैमानिकांच्या ३१व्या तुकडीचे २९ वैमानिक तसेच सहा प्रशिक्षक देशसेवेत दाखल झाले. या वैमानिक व प्रशिक्षकांना दिमाखदार सोहळ्यात ‘एव्हिएशन विंग’ व ‘एव्हिएशन इन्स्ट्रक्टर बॅज’ प्रदान करण्यात आले.
नाशिकच्या गांधीनगर येथील ‘कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूल’च्या(कॅट्स) दीक्षांत सोहळा शनिवारी (दि. ११) पार पडला. युद्धजन्य परिस्थितीत हेलिकॉप्टर चालविणे, शत्रूवर हवाई हल्ला करणे, भुदलाला रसद पुरविणे, जखमींना सुरक्षितपणे उपचारार्थ तत्काळ हलविणे आदी बाबींचे शास्त्रशुद्ध सैनिकी लढाऊ हेलिकॉप्टर चालनाचे प्रशिक्षण या केंद्रातून प्रशिक्षणार्थींना देण्यात आले. वैमानिकांचा दीक्षांत सोहळा लष्करी थाटात पार पडला. या सोहळ्याचे प्रमुख अतिथी स्कूल आॅफ आर्टीलरी, देवळालीचे लेफ्टनंट जनरल रणबीर सिंग सलारीया होते.
http://www.lokmat.com/videos/nashik/army-aviation-passing-our-parred-nashik/
चित्ता, चेतक, धु्रव या लढाऊ हेलिकॉप्टर्सच्या साक्षीने व चित्तथरारक युद्ध प्रात्यक्षिकांनी रंगलेला ‘कॅट्स’चा दीक्षांत सोहळ्याने उपस्थितांच्या डोळ्यांची पारणे फेडली. सैनिकी ब्रास बॅण्ड पथकाच्या विविध सुरांच्या तालावर प्रशिक्षणार्थी जवानांनी परेड सादर करत उपस्थित लष्करी अधिकारी वर्गाला मानवंंदना दिली.धाडस व कौशल्याच्या जोरावर उड्डाण करणारा लढाऊ वैमानिक यशस्वी होतो.‘एव्हिएशन स्कूल’च्या उत्तम व्यासपीठावरुन तुम्ही दाखल झाले आहात, त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने कौशल्यपूर्ण कामगिरीवर भर द्या, असा गुरुमंत्र सलारिया यांनी यावेळी दिला. सुरक्षित उड्डाण करत लक्ष्य पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. शारीरिक व मानसिक आरोग्य एका उत्कृष्ट लढाऊ हेलिकॉप्टर वैमानिकासाठी आवश्यक ठरते, ह विसरू नये, हॅप्पी लॅण्डिंग, जय हिंद म्हणून त्यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.
दरम्यान, प्रशिक्षण कालावधीत आपल्या कौशल्यपूर्ण अशा उत्कृष्ट कामगिरीबद्दल कॅप्टन अंकित मलिक यांना मानाची ‘सिल्वर चित्ता’ तसे मेजर प्रभप्रीत सिंग यांना ‘मेजर प्रदीप अग्रवाल’स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले. येथील केंद्राने आपल्या प्रशिक्षण कालावधीचे ३२ वर्षे पूर्ण केले असून ३३व्या वर्षात पदार्पण केले आहेत. या कालावधीत अनेक प्रशिक्षित कौशल्यधिष्ठित लढाऊ हेलिकॉप्टर चालविणारे वैमानिकांच्या तुकड्या येथून घडविल्या गेल्या आहेत. त्यामुळे ‘कॅटस्’चा इतिहास वैभवशाली राहिला आहे.