नाशिक : उपनगर परिसरात ज्याठिकाणी नेहमी फळ विक्रेत्यांची दुकाने थाटलेली असतात तो परिसरही सध्या सुनसान झाला आहे. रस्त्यावर एकही फळविक्रेता दिसून येत नाही. यामुळे नागरिकांना फळ खरेदीसाठी थेट नाशिक रोडला जावे लागते.
उपनगर परिसरात अनेक रुग्णांचा बाहेर वावर
नाशिक : उपनगर परिसरातील अनेक भागांत कोरोना रुग्ण आढळून येत असून, हे रुग्ण राजरोसपणे बाहेर फिरत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे कोरोनाचा प्रसार वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा रस्त्यावर फिरणाऱ्या रुग्णांना अटकाव करावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.
जुने नाशिक भागात गर्दी
नाशिक : शहरातील अनेक भागात संचारबंदीचे पालन केले जात असले तरी जुने नाशिक भागात काही ठिकाणी नागरिकांची रस्त्यावर गर्दी दिसून येते. अरुंद रस्ते आणि त्यात होणारी गर्दी यामुळे फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमाचा फज्जा उडत आहे. याबाबत कारवाई करण्याची मागणी होत आहे.
शेतीची कामे खोळंबली
नाशिक : ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्याचा शेतीच्या कामांवर परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी मजूर कामाला जाण्यापेक्षा घरीच थांबणे पसंत करत असल्यामुळे शेतकऱ्यांची कामे खोळंबली आहेत. उन्हाळी पिके काढणीसाठी मजूर मिळणे कठीण झाले आहे.
ग्रामणी भागात टँकरची मागणी
नाशिक : वाढत्या उन्हामुळे ग्रामीण भागात विहिरींनी तळ गाठला असून, काही ठिकाणी पाणीपुरवठा योजनांवरही परिणाम झाला आहे. यामुळे ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून, अनेक ठिकाणी टँकर सुरू करण्याची मागणी होत आहे.
अल्प उपस्थितीमुळे कामे रखडली
नाशिक : राज्य शासनाने शासकीय कार्यालयांमध्ये १५ टक्के उपस्थितीचा नियम सुरू केल्याने अनेक कार्यालयांमध्ये नागरिकांची कामे खोळंबली आहेत. कर्मचारी उपलब्ध नसल्याने कामांचा निपटारा होत नाही. यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
रेल्वेस्थानकावर परप्रांतीय मजुरांची गर्दी
नाशिक : राज्य शासनाने जिल्हाबंदी लागू केल्याने रेल्वेस्थानकावर परप्रांतीय मजुरांची गर्दी वाढली आहे. अनेक परप्रांतीय मजूर पुन्हा आपापल्या गावाकडे परतु लागले आहेत. यामुळे अनेक ठिकाणी बांधकामांवर परिणाम झाला आहे. गावी गेलेले मजूर केव्हा परततील, याचा अंदाज नसल्याने कामे लांबण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
बिटको रुग्णालयात बेड मुश्कील
नाशिक : महापालिकेच्या नवीन बिटको रुग्णालयात कोरोना रुग्णांची गर्दी वाढत असून, याठिकाणी बेड मिळणे मुश्कील झाले आहे. खासगी रुग्णालयांमध्येही बेड मिळत नसल्याने गंभीर रुग्णांची स्थिती अधिकच बिकट होत आहे. याबाबत उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येत आहे.
रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाण चिंताजनक
नाशिक : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सुरुवातीची लक्षणे दिसत नसली तरी रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाण चिंताजनक असल्याचे मत वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांकडून व्यक्त केले जात आहे. थोडीजरी लक्षणे दिसली तरी नागरिकांनी त्वरित तपासणी करून औषधोपचार सुरू करावा, असा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे.