शफीक शेख मालेगावतालुक्यातील रावळगाव गट सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुला झाल्यामुळे यंदाच्या पंचवार्षिक निवडणुकीत या गटात काट्याची टक्कर होत आहे. शिवसेना व भाजपाच्या दोघा उमेदवारांमध्ये सरळ लढत होत आहे. तसेच रिपाइं गवई गटासह अपक्ष उमेदवारदेखील नशीब आजमावत आहेत. या मातब्बरांच्या लढाईकडे तालुक्याचे लक्ष लागून आहे. शिवसेनेने रमेश अहिरे यांना उमेदवारी दिली, तर शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्यासाठी भाजपाने शेतकी संघाचे चेअरमन समाधान हिरे यांना निवडणूक रिंगणात उतरविले आहे. कॉँग्रेस व राकॉँचे अशोक शिरोळेदेखील निवडणूक रिंगणात आहेत. रिपाइंचे प्रशांत गरुड यांच्या उमेदवारीने तिरंगी होणारी लढत अंतिम टप्प्यात दुरंगीच होणार आहे. शिवसेना व भाजपाच्या दोघा उमेदवारांमध्ये टशन दिसून येत आहे. पंधरा वर्षांपासून रावळगाव गटावर शिवसेनेने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. रावळगाव गणातील पंचायत समितीचे उमेदवार शरद कासार यांना पंचायत समितीचे उपसभापतिपदही बहाल केले होते. तर विद्यमान सदस्य सुरेश पवार यांनी शिवसेनेचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यामुळे या गटाला खिंडार पाडण्यासाठी भाजपाने हिरे गटाचे कट्टर समर्थक व शेतकी संघाचे विद्यमान चेअरमन हिरे यांनाच रिंगणात उतरविल्यामुळे शिवसेनेला मातब्बर उमेदवाराचा सामना करावा लागत आहे. रिपाइंचे प्रशांत गरुड रिंगणात उतरल्यामुळे ही लढत तिरंगी झाली होती. संजय जाधव हे पूर्वाश्रमीचे शिवसेनेचे असले तरी गेल्या काही वर्षांपासून त्यांनी सेनेची साथ सोडली आहे. त्यांची अपक्ष म्हणून असलेली लढत सेनेच्या मतांचे विभाजन करण्याची शक्यता आहे. प्रशांत गरुड व संजय जाधव यांची हिरे आणि अहिरे यांना डोकेदुखी ठरत आहे. प्रशांत गरुड हे स्थानिक उमेदवार आहेत. सेनेसाठी ही अस्तित्वाची लढत असून, राज्यमंत्री दादा भुसे यांना या गटात कार्यकर्त्यांसह ठाण मांडून बसावे लागत आहे. भाजपानेही केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांची प्रचारसभा घेतली असून, सेनेला मात्र स्थानिक नेतृत्वावरच प्रचाराची धुरा सांभाळावी लागत आहे. पंधरा वर्षांपासून शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या या गटावर वर्चस्व सिद्ध करण्यासाठी सर्वच उमेदवारांना कंबर कसावी लागत आहे, तर हातातून गेलेला गट पुन्हा मिळविण्यासाठी भाजपाने सर्व शक्ती पणाला लावली आहे. भाजपा-सेनेच्या लढाईत कॉँग्रेस- राष्ट्रवादी कॉँग्रेस आघाडीने मैदानात उतरविलेले उमेदवार अशोक शिरोळे हे तळवाडे येथील रहिवासी आहेत. कॉँग्रेससाठीसुद्धा ही अस्तित्वाची लढाई असल्याने हिरे-अहिरे यांच्यासमोर शिरोळे यांचे मोठे आव्हान असल्याने सेना-भाजपा यांची गुंतागुंत वाढली आहे.
सेना-भाजपातच चुरस
By admin | Published: February 19, 2017 1:33 AM