नरेंद्र दंडगव्हाळ सिडकोशिवसेना व भाजपात उमेदवारीवरून झालेली रस्सीखेच, परिणामी भाजपासमोर बंडखोराने उभे केलेले आव्हान तर सेनेच्या इच्छुकाने ऐनवेळी भाजपाकडून घेतलेली उमेदवारी, कॉँग्रेस व राष्ट्रवादीची पराभूत मानसिकता, मनसेचे तेच तेच चेहरे प्रभाग क्रमांक २५ मधून आपले भवितव्य आजमावित आहेत. चार जागांसाठी चाळीस उमेदवार आहेत. शिवसेनेचे दोन व मनसेचे दोन असे चार विद्यमान नगरसेवक एकमेकांच्या विरोधात उभ्या ठाकलेल्या प्रभाग क्रमांक २५ मधील राजकीय परिस्थिती संमिश्रावस्थेत आहे. प्रभागातील ‘अ’ नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) या गटातून शिवसेनेचे विद्यमान नगरसेवक सुधाकर बडगुजर, भाजपाकडून मुरलीधर भामरे, मनसेकडून अॅड. अतुल सानप या तिघांमध्येच प्रमुख लढत आहे. कॉँग्रेस आघाडीकडून या गटात उमेदवार देण्यात आलेला नाही, त्यामुळे सेनेचे बडगुजर विरुद्ध भाजपाचे भामरे व मनसेचे सानप यांच्यातच ही लढत आहे. तसे पाहिले तर भामरे हे पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे असून, त्यांनी तसेच मनसेचे सानप यांनी यापूर्वी बडगुजर यांच्याशी दोन हात केले आहेत व त्यात ते दोघेही अपयशी ठरले आहेत. परंतु पुन्हा हे दोघेही रिंगणात उतरले आहेत. ‘ब’ सर्वसाधारण महिला गटातून शिवसेनेच्या विद्यमान नगरसेवक व सुधाकर बडगुजर यांच्या पत्नी हर्षा बडगुजर यांना उमेदवारी देण्यात आली असून, मनसेकडून सावित्री रोजेकर व भाजपाकडून पुरस्कृत अर्चना किरण शिंदे यांना मैदानात उतरविण्यात आले आहे. रोजेकर यांनी गेल्या निवडणुकीतही मनसेकडून उमेदवारी केली होती, तर अर्चना शिंदे यांचे पती किरण हे शिवसेनेकडून या प्रभागातून इच्छुक होते, परंतु पक्षाने उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी भाजपात प्रवेश करून पत्नी अर्चना हिच्यासाठी उमेदवारी घेतली. त्यामुळे या प्रभागात सेना विरुद्ध सेना अशीच लढत आहे.‘ड’ सर्वसाधारण खुल्या गटातून एकूण अकरा उमेदवारांनी एकमेकांसमोर आव्हान उभे केले आहे. सेनेकडून श्यामकुमार साबळे, मनसेकडून विद्यमान नगरसेवक अनिल मटाले, भाजपाकडून संतोष अरिंगळे, राष्ट्रीय समाज पक्षाकडून कैलास पाटील, राष्ट्रवादीकडून योगेश गांगुर्डे, भारतीय संग्राम परिषदेकडून नितीन राजेंद्र अमृतकर, बहुजन समाज पक्षाकडून विशाल लक्ष्मण गांगुर्डे, अपक्षांमध्ये भाजपाचे बंडखोर प्रकाश अमृतकर, आशिष हिरे, तुषार साळुंके, तुषार मटाले यांचा समावेश आहे. भाजपाचे प्रकाश अमृतकर यांना पक्षाने उमेदवारी नाकारल्यामुळे त्याचा फटका भाजपाला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सेना, भाजपाला बंडखोरांचा धोका
By admin | Published: February 11, 2017 12:11 AM