देवळाली कॅम्प : संरक्षण मंत्रालयाने देशातील लष्कराला दूध पुरवठा करणाºया दूध डेअरी बंद करण्याचा निर्णय घेतला असला तरी नाशिकमध्ये देवळाली कॅम्पस्थित डेअरी बंद होण्याची शक्यता नसल्याचे वृत्त आहे. केवळ तोट्यातील डेअरीच बंद करण्यात येणार असल्याने नाशिकची डेअरी त्यातून वगळली जाण्याची शक्यता आहे.१८८९ मध्ये ब्रिटिशांनी लष्करी भागात दूध पुरवठा करण्यासाठी अशाप्रकारचे डेअरी फार्म सुरू केले होते. २०१२ मध्ये लष्कराच्या क्वॉर्टर मास्टर जनरल विभागाच्या वतीने देशभरातील अशा दूध डेअरींचे सर्वेक्षण आणि मूल्यमापन करण्यात आले, तसेच खर्चिक असणाºया ३९ पैकी २९ डेअरी फार्म बंद करण्यात आले. उर्वरित दहा डेअरी फार्म आॅक्टोबर महिन्यापर्यंत बंद करण्याचे ठरविण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. नाशिकमधील देवळाली कॅम्प येथील दूध डेअरीत सुमारे २०० कामगार काम करीत असून, कोट्यवधी रुपयांची यंत्रसामग्रीत गुंतवणूक आहे. सुमारे एक कोटी रुपयांची ही डेअरी बंद पडल्यास कामगारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार आहे. दरम्यान, डेअरी बंदसंदर्भात अद्याप कोणतेही अधिकृत आदेश प्राप्त झालेले नाही, तसेच फायद्यातील डेअरी बंद करण्यात येणार नसल्याने देवळाली कॅम्प येथील डेअरी सुरूच राहण्याची शक्यता आहेत.
लष्कराची डेअरी राहणार सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2017 1:04 AM