भगूर-नानेगाव हा पारंपरिक वहिवाटीचा रस्ता असून, भगूरच्या उड्डाणपुलाजवळून मरिमाता मंदिर ते पुढे फरजंदी बाग व नानेगाव असा वाहतुकीचा मार्ग आहे. अनेक वर्षांपासून नागरिक त्याचा वापर करत असताना दोन वर्षांपासून लष्करी आस्थापनेकडून विजयनगर भागात कार्यालय व रहिवासी इमारती उभे करण्याकामी संरक्षक भिंतीचे काम गरजेचे असल्याचे लष्करी अधिकारी सांगत असतात. या कामात रेल्वे गेट ते मरिमाता मंदिर एवढ्या परिसरातील जागा वादाचा मुद्दा ठरत असून, संरक्षक भिंतीच्या कामाला विरोध होऊनही अखेर भिंतीचे काम सुरू झाले आहे. नानेगावला जाणारा रस्ता बंद झाला तर ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांना, कामगारांना थेट पळसे येथून नाशिकरोडमार्गे भगूर असा प्रवास करावा लागू शकतो. विशेष म्हणजे सात-आठ वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र शासनाकडून रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. नानेगाव ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार गतवर्षी झालेल्या बैठकीत तत्कालीन ब्रिगेडियर पी. रमेश, जे. एस. गोराया यांनी नऊ मीटरचा रस्ता ग्रामस्थांसाठी देण्याबाबत लेखी पत्र दिलेले आहे. दोन वर्षांत तीन ब्रिगेडियर यांनी रस्त्याची पाहणी करत ग्रामस्थांवर अन्याय होणार नाही, असे सांगितले होते. मागील दोन महिन्यांपूर्वी खासदार हेमंत गोडसेंसह नानेगावच्या ग्रामस्थांनी नवीन ब्रिगेडियर ए. राजेशसह लष्कराच्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसह पाहणी केली होती. तेव्हा संरक्षण मंत्रालयाकडून रस्त्या व संरक्षक भिंतीबाबत पत्रव्यवहारानंतर निर्णय घेण्याचे ठरले होते. पूर्वीपासून भगूर रेल्वे गेटलगत नानेगाव जाणारा रस्ता नकाशावर आहे. विशेष म्हणजे ज्या जागेवरून रस्ता ठेवायचा होता तिथे मागील वर्षीच भिंत बांधून पर्यायी जागेतून रस्ता देण्याचे ठरले होते, मात्र त्या पर्यायी जागेतून रस्ता द्यायचा तिथूनच भिंत बांधण्याचे काम सुरू झाल्याने नानेगावला जाणारा रस्ताच बंद होणार आहे.
(फोटो २६ रोड)