सिन्नर : तालुक्यातील वावीच्या शाळेतील विद्यार्थ्यांसह बाजारपेठेतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढल्याने जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधीन शेळकंदे, गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे यांच्यासह अधिकाऱ्यांचा फौजफाटा रस्त्यावर उतरून प्रत्यक्ष कारवाई करीत असल्याचे चित्र दिसून आले. दरम्यान, माध्यमिक विद्यालयात कोरोनाबाधित विद्यार्थी आढळून आल्याने शाळा सात दिवस बंद ठेवण्याचा निर्णय स्थानिक प्रशासन व शालेय समितीने घेतला आहे.
गावात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढल्याने जिल्हा परिषदेचे पथक बुधवारी (दि. १७) सायंकाळी गावात दाखल झाले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधीन शेळकंदे, गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे, सहायक पोलीस निरीक्षक सागर कोते, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी प्रल्हाद बिब्बे, वैद्यकीय अधिकारी डॉ. छाया राशीनकर, वावीचे ग्रामविकास अधिकारी परेश जाधव यांच्यासह पथकाने गावात फिरून विनामास्क व दुकानात नियमांचे उल्लंघन केलेल्या व्यावसायिकांवर कारवाईचा बडगा उगारला. ९ ग्राहक व व्यावसायिकांना विनामास्क आढळून आल्याप्रकरणी त्यांच्याकडून १ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ग्रामपंचायत प्रशासनानेही गृहविलगीकरण असलेल्या रुग्णांना बाहेर न फिरण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत.
दरम्यान, सरपंच कन्हैयालाल भुतडा, उपसरपंच मीना काटे, सदस्य विजय काटे, प्रशांत कर्पे, संदीप राजेभोसले, कैलास जाजू, विनायक घेगडमल, सचिन वेलजाळी, प्रदीप वेलजाळी यांच्यासह आरोग्य कर्मचारी, आशा कार्यकर्त्या व पथकातील कर्मचाऱ्यांनी गावातून फेरी काढून कोरोनाबाबत जनजागृती केली.
इन्फो
रॅपिड टेस्ट सुरू
वावी गावात सध्या मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह रुग्ण वाढल्याने येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रॅपिड (आरटीपीसीआर) टेस्ट सुरू करण्यात आल्या आहेत. दोन दिवसांत वावी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कक्षेत १०४ रॅपिड टेस्ट करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. छाया राशीनकर (खाटेकर) यांनी दिली. बुधवारी ५ तर गुरुवारी ९ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.