गणेश धुरी नाशिकशेवटपर्यंत बंडखोरी रोखण्याचे प्रयत्न अयशस्वी झाल्याने शिवसेनेचा पारंपरिक बालेकिल्ला असलेला पळसे गट कायम राखण्याचे आव्हान शिवसेनेसमोर आहे. कारण मागील अपवाद वगळता गेल्या तीन पंचवार्षिकपासून येथून शिवसेनेचा उमेदवार निवडून येण्याची परंपरा आहे. पळसे गट तसे पाहिले तर पारंपरिक शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. ज्याला शिवसेनेकडून तिकीट मिळेल तो उमेदवार हमखास विजयी होईल, अशा अटकळी बांधल्या जात होत्या. मात्र बंडखोरांना रोखण्यात पक्षनेत्यांना अपयश आल्याने शिवसेनेसमोर अपक्षांचे अर्थात पळसे विकास आघाडीचे आव्हान उभे राहिले आहे. नाशिक सहकारी साखर कारखानाही याच गटात येत असल्याने सहकाराभोवती राजकारण फिरत असते. मात्र शिवसेनेचा सुकर होणारा विजय संजय तुंगारांच्या उमेदवारीने काहीसा अवघड वाटेवर गेल्याचे चित्र आहे. अनिल ढिकले यांना उमेदवारी नाकारल्याने ते शिवसेनेचे काम करतात, की शांत राहतात, हेही महत्त्वाचे ठरणार आहे.पळसे आणि सिद्धप्रिंपी गणातून अपक्षांच्या आघाडीला मिळालेले उमेदवारही गटातील चित्र पालटवू शकतात.पळसे गटातील शिंदे, सिद्धप्रिंपी व पळसे या गावांमध्ये गटाचा निकाल बदलविण्याची क्षमता आहे. विकास आघाडीचे सेना बंडखोर उमेदवार संजय तुंगार यांच्यासह शिवसेनेचे अधिकृत उमेदवार जगन आगळे, राष्ट्रवादीकडून सिद्धप्रिंपी गावातील यशवंत ढिकले, भाजपाकडून नंदू नरवडे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून दीपक गायधनी यांच्यासह अपक्ष विलास गायधनी या गटातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. शिंदे गावातून संजय तुंगार, सिद्धप्रिंपी गावातून यशवंत ढिकले, पळसे गावातून जगन आगळे यांनी उमेदवारी केल्याने लढत तिरंगी होत आहे.
सेनेच्या बालेकिल्ल्याला बंडखोरीचा सुरुंग
By admin | Published: February 16, 2017 11:02 PM