नाशिक : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या अखेरच्या दसरा मेळाव्याच्या भाषणात देशाला ‘पंचक’पासून मुक्त करण्याची इच्छा बोलून दाखविली होती; मात्र सध्या शिवसेनेच्या काही नेत्यांच्या मनात ‘पंचक’चे उफाळून आलेले प्रेम अनाकलनीय असल्याचा टोला भाजपाचे राष्टय प्रवक्ते प्रेम शुक्ला यांनी पत्रकार परिषदेत लगावला. बाळासाहेबांच्या वक्तव्याचा शिवसेनाला विसर पडल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.भाजपाची दिल्ली येथे नुकतीच राष्ट्रीय कार्यकारिणी घोषित करण्यात आली. या पार्श्वभूमीवर शुक्ला हे राज्याच्या दौऱ्यावर आहे. यानिमित्त रविवारी त्यांनी शहराच्या भाजपा कार्यालयात पत्रकार परिषद बोलाविली. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी विरोधक हे परिवाराची लढाई लढत असल्याचे तर भाजप हा देश व देशाचे संविधान वाचविण्यासाठी लढा देत असल्याचे म्हटले. सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी, राबर्ट वढेरा, अहमद पटेल या पंचकपासून देश मुक्त करा, असे बाळासाहेब त्यावेळी म्हणाले होते; मात्र सध्या डोळ्यासमोर काही वेगळीच परिस्थिती आहे. या पंचकाविषयी सेनेचे उफाळलेले प्रेम बाळासाहेब ठाकरे यांच्या वक्तव्यावर पाणी फिरविणारे असल्याचा आरोप शुक्ला यांनी यावेळी केला.२०१९ची निवडणूक भाजपा स्वबळावर लढणार असून, यंदाचे मिशन ३००पेक्षा अधिक जागांचे आहे आणि भाजपाचे कमळ या सर्व जागांवर फुलल्याशिवाय राहणार नाही, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.तत्कालीन योजना पोहोचल्याच नाहीत...काँग्रेसच्या काळातील योजनांवर टीका करताना ज्या लाभार्थ्यांसाठी योजना काढल्या त्यांच्यापर्यंत त्याचा लाभ पोहचलाच नाही, उलट ज्यांना गरज नव्हती अशांनीच या योजनांच्या माध्यमातून मलिदा लाटल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात जनतेच्या योजना या जनतेपर्यंत थेट पोहचविल्या जात असून, गोरगरिबांना स्वस्त धान्याचा पुरवठा केला जात आहे. एकूणच मोदींच्या काळात सरकारी योजना अधिक बळकट झाल्या व लाभार्थ्यांना त्याचा थेट लाभ मिळाल्याचा दावा शुक्ला यांनी यावेळी बोलून दाखविला.
‘पंचक’विषयी सेनेची भूमिका वेगळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 1:16 AM