नाशिक - नव्याने निर्माण होणाऱ्या मिळकतींसाठी पाच ते सहा पट करवाढ करत भाजपाने दत्तक नाशिककरांना भेट दिली आहे. आयुक्तांच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजपाकडूनच नाशिककरांवर ही करवाढ लादली जात आहे. सत्ताधारी भाजपाने या करवाढीबद्दल आपली भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा नागरिकांना ही करवाढ मान्य आहे किंवा नाही, याबाबतच शिवसेनेकडून ‘मिसकॉल’ अभियान राबविले जाणार असल्याची माहिती महापालिकेतील विरोधीपक्षनेते अजय बोरस्ते यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.महापालिका आयुक्तांनी नव्याने निर्माण होणा-या मिळकतींसह मोकळ्या जमिनींवरही कर आकारणी निश्चित केली आहे. या करयोग्य मूल्य वाढीबद्दल बोलताना अजय बोरस्ते यांनी सांगितले, महापालिकेने कुणालाही विश्वासात न घेता ही तुघलकी करवाढ केलेली आहे. या करवाढीमुळे सत्ताधा-यांचे डोके ठिकाणावर आहे काय, असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. करवाढीचा बाण आयुक्तांच्या कमानीतून सुटला असला तरी सत्ताधारी भाजपाची याबाबत नेमकी काय भूमिका आहे, हे त्यांनी स्पष्ट करायला हवे. नाशिकच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठया प्रमाणावर वाढ करण्यात आलेली आहे. त्यामुळे, आधीच सरकारी धोरणांमुळे पिचलेल्या जनतेवर हा करवाढीचा बोजा लादून त्यांच्यावर अन्याय केला जात आहे. या सा-या प्रकारात जनतेचीही बाजू ऐकून घेतली जाणार आहे. नाशिककरांना ही करवाढ मान्य आहे किंवा नाही, याबाबत शिवसेनेकडून ‘मिसकॉल’ अभियान राबविले जाणार आहे. नाशिककरांना करवाढ मान्य नसेल तर नागरिकांना सोबत घेऊन व्यापक स्वरुपात आंदोलन उभे करण्याचा इशाराही बोरस्ते यांनी दिला.महापौरांनी पुढाकार घ्यावाआयुक्तांनी केलेल्या करवाढीबद्दल महापौरांनी तातडीने भूमिका स्पष्ट केली पाहिजे. त्यांनाही दरवाढ मान्य नसेल तर सर्व विरोधी पक्षांना समवेत घेऊन सदर करवाढ रद्द करण्यासाठी पुढाकार घ्यावा. सर्व विरोधी पक्ष त्यांच्या नेतृत्वाखाली त्या विरोधात लढा पुकारतील. आता भाजपाने आपली बोटचेपी भूमिका थांबविली पाहिजे, असेही बोरस्ते यांनी स्पष्ट केले.
नाशकात करवाढीबद्दल सेनेचा भाजपावर निशाणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2018 2:22 PM
मिळकत करवाढ : शिवसेना राबविणार ‘मिसकॉल’ अभियान
ठळक मुद्देमहापालिका आयुक्तांनी नव्याने निर्माण होणा-या मिळकतींसह मोकळ्या जमिनींवरही कर आकारणी निश्चित केली आहे