मालेगाव : शहरात म्युकरमायकोसिससदृश रुग्ण आढळल्यास त्यांना उपचारासाठी सामान्य रुग्णालयात पाठविले जात असल्याची माहिती मनपाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सपना ठाकरे यांनी दिली. कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांना म्युकरमायकोसिससदृश लक्षणे आढळल्यास त्यांनी तत्काळ नाक, कान, घशाचे डॉक्टर तसेच दात दुखत असल्यास दातांच्या डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी, असे आवाहन मनपा आरोग्य विभागाने पत्रकान्वये केले आहे.
शहरात म्युकरमायकोसिससदृश आजाराची लक्षणे आढळलेल्या रुग्णांना सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आल्याचे डॉ. ठाकरे यांनी सांगितले. दरम्यान, याबाबत सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. किशोर डांगे यांच्याशी संपर्क साधला असता म्युकरमायकोसिस झालेल्या रुग्णांवर उपचारासाठी जी तयारी करावी लागते, त्यासाठी लागणारी साहित्य, सामग्री आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्याकडे नसल्याने आपण दोन दिवस औषध गोळ्या देऊन प्राथमिक उपचार करतो. त्यानंतर रुग्णाची अवस्था पाहून त्याला धुळे येथे शासकीय रुग्णालयात दाखल करतो, असे डॉ. डांगे यांनी सांगितले, तर महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी सपना ठाकरे म्हणाल्या, मुख्यमंत्र्यांची याबाबत अजून व्ही. सी. झालेली नाही. राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडून मार्गदर्शक सूचना आल्यानंतर त्यानुसार व्यवस्था केली जाईल.
---------------------------
उर्दू पत्रके छापून जनजागृती
मालेगाव शहर यंत्रमाग कारखान्यात काम करणाऱ्या यंत्रमाग मजुरांचे शहर आहे. कोरोना येण्यापूर्वी जसे उर्दू पत्रके छापून जनजागृती करण्यात असली होती तशी जनजागृती करण्याची आवश्यकता आहे. अचानक म्युकरमायकोसिसचे रुग्ण वाढल्यास धावपळ करण्यापेक्षा मनपा आरोग्य विभागाने वॉर्डांची व्यवस्था करून तज्ज्ञ डॉक्टर्सची टीम तयार ठेवण्याची आवश्यकता आहे. कारण आताच म्युकरमायकोसिससदृश रुग्ण आढळत असून, त्यांना उपचारार्थ धुळे येथे पाठवले जात असेल तर मालेगाव शहरातील भविष्यात आढळणाऱ्या म्युकरमायकोसिस आजाराच्या रुग्णांचे भविष्य रामभरोसे आहे, असेच म्हणावे लागेल.