नाशिक : कोरोनाची तिसरी लाट येईल की नाही याबाबत शंका उपस्थित होत असताना ओमायक्रॉन या नव्या विषाणूने चिंता वाढवली असून, त्यामुळे बिटको तसेच डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात अडीच हजार खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे, तर दुसरीकडे महापालिकेने महाकवच ॲप तसेच ऑनलाइन डॅश बोर्ड अशा सर्वच यंत्रणा पुन्हा उभी करतानाच कॉन्टॅक्ट ट्रेसिंग पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर शासनाने निर्बंध शिथिल केले असले तरी तिसऱ्या लाटेची तयारी करण्याचे आदेश केंद्र शासनाने दिले होते. दुसऱ्या लाटेपेक्षा तिसरी लाट पाच पट मोठी असेल असे सांगून त्या दृष्टीने ऑक्सिजन तसेच खाटा सज्ज ठेवण्याचे आदेश देण्यात आले हेाते. त्यानुसार महापालिकेने नवीन बिटको रुग्णालय तसेच झाकीर हुसेन रुग्णालय आणि कोविड सेंटरमध्ये व्यवस्था सुरू केल्या असून, अडीच हजार खाटांची सज्जता करण्यात आली आहे. या सर्व ठिकाणी ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर्सच किती उपलब्ध आहेत त्याचा आढावाही घेण्यात आला आहे. आवश्यकतेनुसार कोविड सेंटर्स वाढवण्याचेदेखील नियोजन करण्यात आले आहे. पहिल्या लाटेच्या वेळी महाकवच ॲप अत्यंत उपयुक्त ठरले हेाते, आता त्याचा पुन्हा वापर करण्यात येणार असून, त्यासाठीदेखील टीम तयार करण्यात येणार आहे.
नाशिक शहरात ओमायक्रॉन बाधित रुग्ण आढळल्यास त्याच्याबराेबरच त्यांच्या सपंर्कातील कुटुंब सदस्य आणि अन्य नागरिकांच्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्याचे कार्यवाहीदेखील करण्यासाठी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे.
इन्फो...
ऑक्सिजन प्लांटची चाचणी सुरू
डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय येथील पीएसए प्लांटमधील सिलिंडर भरणे तसेच ऑक्सिजन गळतीची चाचणी घेण्यात येत असून, मीनाताई ठाकरे कोविड सेंटर तसेच संभाजी स्टेडियम येथील कोविड सेंटर येथेही पीएसए प्लांट उभारण्यात येणार असून, त्या दृष्टीनेदेखील चाचणी घेतली जाणार आहे. सातपूर येथील मायको रुग्णालयात बॉश कंपनीने पीएसए प्लांट बसविण्यात आला असून, तेथेही खाटा आणि पाणीपुरवठा करण्याचे निर्देश आयुक्त कैलास जाधव यांनी दिले आहेत.
इन्फेा...
हेल्पलाइन पुन्हा सुरू होणार
कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत महापालिकेने हेल्पलाइन सुरू केली हेाती. त्याचा कितपत उपयोग झाला हा भाग वेगळा असला तरी रुग्णालये आणि अन्य माहितीसाठी ही हेल्पलाइन पुन्हा सुरू करण्यात येेणार आहे. तसेच त्यासाठी कर्मचाऱ्यांना खास प्रशिक्षण देण्यात येेणार आहे.