नाशिक : अनैतिक संबंधाच्या वादातून प्रेयसीसह तिची मुलगी व नातीच्या अंगावर रॉकेल ओतून जाळून मारल्यानंतर फरार संशयितास पोलिसांनी मथुरेहून ताब्यात घेतल्यानंतर पुन्हा फरार झालेला जलालुद्दीन अली मोहम्मद खान यास पोलिसांनी शुक्रवारी (दि. १७) रात्री उत्तर प्रदेशातील अलिगड (बिनिपूर) येथून जेरबंद केले़गत दहा दिवसांपूर्वी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांचे पथक विमानाने रवाना करण्यात आले होते. या पथकाने (दि.७) खान यास ताब्यात घेऊन झेलम एक्स्प्रेसने नाशिकला रेल्वेने आणत असताना मथुरा येथील रेल्वेस्थानकावर रेल्वे हळुवार होताच अंधाराचा फायदा घेत चालत्या रेल्वेतून उडी मारून पलायन केले. त्यास पकडण्यासाठी रेल्वेतून उडी मारल्याने पोलीस उपनिरीक्षक दीपक गिरमे हे जखमी झाले होते़ त्यानंतर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोधपथक तीन दिवस उत्तर प्रदेशातील मथुरा भागात तळ ठोकून होते मात्र, खान न सापडल्याने हे पथक रिकाम्या हाती परतले होते़यानंतर संशयितखान फरार झाला होता़ या तिघांच्या हत्येतील फरार खानला पकडण्याचे पोलिसांसमोर आव्हान होते़ दरम्यान, दोन दिवसांपूर्वी वरिष्ठ व पोलीस निरीक्षक आनंदा वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी, पोलीस हवालदार प्रवीण कोकाटे, स्वप्नील जुंद्रे, दीपक जठार, राहुल पालखेडे, विशाल देवरे यांचे पथक शोधासाठी रवाना करण्यात आले होते़ त्यांनी अलीगड जिल्ह्णातील बिनिपूर येथून खान यास ताब्यात घेतले़दिंडोरी रोडवरील मायको दवाखान्याच्या पाठीमागे असलेल्या कालिकानगर येथे संशयित जलालुद्दीन खान याने ६ आॅगस्ट २०१८ रोजी प्रेयसी संगीता देवरे समवेत झालेल्या वादातून प्रेयसीसह तिची मुलगी प्रीती शेंडगे व नात सिद्धी शेंडगे वय (९ महिने) या झोपेत असताना त्यांच्या अंगावर रॉकेल ओतून जिवंत जाळल्याची घटना घडली होती.
तिहेरी खुनातील फरार संशयिताला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 1:08 AM