नाशिक : शहराची सुरक्षाव्यवस्था पोलिसांनी कडक केली असून, सराईत गुन्हेगारांची सर्वच पोलीस ठाण्यांच्या हद्दीत धरपकड सुरू करण्यात आली आहे. मिशन आॅल आउट, कोम्बिंग आॅपरेशनसारख्या मोहिमांच्या माध्यमातून मध्यरात्री उशिरापर्यंत वाहनांची तपासणी करत सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जात आहे. अद्याप ९२ गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली असून, फरार २१ संशयितांपैकी दोघांच्या पोलिसांनी मुसक्या बांधल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर बॉर्डर सिलिंग पॉइंटसह सर्वच नाक्यांवर पोलीस तैनात करण्यात आले आहेत. विशेषत: तपोवन परिसरावर आडगाव, पंचवटी, शहर गुन्हे शाखांच्या विशेष पथकांचे लक्ष आहे.शहरात मंगळवारपासून (दि.१७) मंत्रिमंडळातील विविध मंत्र्यांचे आगमन होणार आहे. यामुळे पुढील सलग तीन दिवस शहर व परिसरात महत्त्वाच्या व अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचा राबता राहणार आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनावर सुरक्षाव्यवस्थेचा अतिरिक्त ताण शुक्रवारपर्यंत कायम असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकमधून दिल्लीला रवाना झाल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सुटकेचा नि:श्वास सोडणार आहे. यादृष्टीने पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील तसेच पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली शहरासह जिल्ह्यात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात ग्रामीण पोलीस लक्ष ठेवून आहेत तसेच शहराच्या सीमेवरील ५२ ते ५४ ‘बॉर्डर सिलिंग पॉइंट’वर पोलीस आयुक्तालयातील सशस्त्र पोलीस तैनात करण्यात आले आहेत. शहरासह जिल्ह्यात शिरकाव करणाºया सर्व प्रकारच्या संशयास्पद वाहनांची पोलीस कसून तपासणी करत आहेत. नाकाबंदीदरम्यान ५४० वाहने तपासण्यात आली आहेत. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºया ९२ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली.लॉज, हॉटेल्स, ढाबे रडारवरशहरातील नांदुरनाका, सिन्नरफाटा, म्हसरूळ गाव, राऊ हॉटेल, अंबड टी पॉइंट, मालेगाव स्टॅण्ड, त्रिकोणी गार्डन, जेहान सर्कल, नारायणबापूनगर, अशोकामार्ग, पाथर्डीफाटा, संसरीनाका, देवळाली कॅम्प आदी ठिकाणी नाकाबंदी करून वाहन तपासणी व गुन्हेगारांचा शोध घेण्यात आला. यावेळी रेकॉर्डवरील गुन्हेगार, नाकाबंदी, मद्यपी वाहनचालक, तडीपार गुन्हेगारांची तपासणी करण्यात येत आहेत. तसेच शहरातील हॉटेल, लॉजचीदेखील झाडाझडती घेतली जात आहेत. महामार्गांवरील ढाब्यांवरही पोलिसांच्या गस्तीपथकाचा ‘वॉच’ आहे. आतापर्यंत ९१ लॉज, ढाबे तपासण्यात आले असून ६०पेक्षा अधिक संशयितांवर मुंबई पोलीस कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. अद्याप शहरात पोलिसांनी १०५ टवाळखोर, ९२ सराईत गुन्हेगारांवर कारवाई केली.
सराईत गुन्हेगारांची धरपकड सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 1:03 AM