नाशिकरोड : जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथे तीन वर्षांपूर्वी भाजपा नगरसेवक रवींद्र खरात यांच्यासह त्यांच्या घरातील एकूण पाच जणांचे हत्याकांड घडविणारा मुख्य संशयित आरबाज खान याला नाशिकरोड पोलिसांनी शुक्रवारी (दि.४) सकाळी मध्यवर्ती कारागृहाजवळ अटक केली आहे. भुसावळ येथे २०१९ मध्ये रिपाइं आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष व भाजपा नगरसेवक रवींद्र बाबुराव खरात ऊर्फ हम्प्या दादा व त्यांच्या कुटुंबातील इतर चार सदस्यांची गोळीबार करून निर्घृण हत्या करण्यात आली होती. तसेच तिघा जणांना गंभीर जखमीही केले होते. या पाच जणांच्या हत्याकांडातील मुख्य संशयित आरोपी आरबाज अजगर खान ऊर्फ गोलू खान हा गेल्या तीन वर्षांपासून फरार असल्याने गुन्ह्याचा तपास मुंबई सीआयडीकडे वर्ग करण्यात आला होता. परंतु तो तीन वर्षांपासून पोलिसांना चकवा देत होता. दरम्यान, नाशिकरोड पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकातील मनोहर शिंदे यांना शुक्रवारी सकाळी संशयित आरबाज खान हा जेलरोड परिसरात फिरत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानंतर तत्काळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक योगेश पाटील, विशाल पाटील, विष्णू गोसावी, अनिल शिंदे, कुंदन राठोड, केतन कोकाटे, सागर आडणे, मनोहर शिंदे, राकेश बोडके, सोमनाथ जाधव यांनी जेलरोड परिसर पिंजून काढत नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहाच्या परिसरातून संशयित आरबाज खान याच्या मुसक्या आवळल्या. जळगाव लोकल क्राईम ब्रँचला आरबाज खान याला पकडल्याची माहिती मिळताच त्यांचे एक पथक सायंकाळी नाशिकरोडला दाखल होऊन त्यांनी खान याला ताब्यात घेतले.
भुसावळ हत्याकांडातील मुख्य संशयितास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2022 1:48 AM
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथे तीन वर्षांपूर्वी भाजपा नगरसेवक रवींद्र खरात यांच्यासह त्यांच्या घरातील एकूण पाच जणांचे हत्याकांड घडविणारा मुख्य संशयित आरबाज खान याला नाशिकरोड पोलिसांनी शुक्रवारी (दि.४) सकाळी मध्यवर्ती कारागृहाजवळ अटक केली आहे.
ठळक मुद्देनगरसेवकासह पाच जणांची झाली होती हत्या : पोलीस तीन वर्षांपासून होते मागावर