नाशिक : गावठी पिस्तूलविक्री, दुचाकीचोरी यांसह जिवे ठार मारण्याच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल असलेला व अनेक दिवसांपासून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झालेला अमरावती जिल्ह्यातील संशयित गिरीश रमेश सोळंके व त्याचा साथीदार दीपक अशोक पवार (रा़ बोरगड, म्हसरूळ) या दोघांना पंचवटी पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने बुधवारी (दि.२८) दुपारी आडगाव नाका परिसरातून अटक केली़
संशयित सोळंके हा मूळचा अमरावती जिल्ह्यातील रहिवासी असून, त्याने शहरातून दुचाकी चोरल्याचे समोर आले आहे़ पंचवटी पोलिसांनी त्याच्याकडून चोरीच्या चार दुचाकीही जप्त केल्या आहेत़ चोरी केलेल्या दुचाकीची विक्री करण्यासाठी सोळंके हा बुधवारी शहरात येणार असल्याची माहिती पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांना मिळाली होती़
सहायक पोलीस निरीक्षक महेश इंगोले, डी. डी. इंगोले, रघुनाथ शेगर, प्रभाकर पवार, संदीप शेळके, दशरथ निंबाळकर, सतीश वसावे, मोतीराम चव्हाण, विलास बस्ते, बाळासाहेब मुर्तडक, सुरेश नरवडे, बाळू ठाकरे, जितू जाधव, विलास चारोस्कर, संतोष काकड, सचिन म्हस्दे, भूषण रायते, महेश साळुंखे आदींनी आडगाव नाका परिसरात सापळा रचून संशयित सोळंके व त्याचा साथीदार दीपक पवार या दोघांना अटक केली़ हे दोघेही चोरीची दुचाकी विक्री करण्यासाठी शहरात आले होते़