नाशिक : सुमारे दीड महिन्यांपूर्वी उंटवाडी येथील मुथूट फायनान्सच्या कार्यालयात लुटीच्या इराद्याने आलेल्या दरोडेखोरांनी गोळीबार करून कार्यालयातील एका अभियंत्याची हत्या केल्याने संपूर्ण शहरात दहशत पसरून पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले होते. मात्र या प्रक रणाचा दीड महिन्यात छडालावण्यात पोलिसांना यश आले असून, या गुन्ह्यातील दोन आरोपींना अटक केल्यानंतर मुख्य आरोपी आकाशसिंग विजयबहाद्दूर सिंह राजपूत याला नाशिक पोलिसांनी बिहारमधून मंगळवारी (दि.२३) अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी शुक्रवारी (दि.२६) आयुक्तालयातील पत्रकार परिषदेत दिली.उंटवाडीतील मुथूट फायनान्सवरील दरोडा प्रकरणात नाशिक पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली होती. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तपास यंत्रणा कार्यान्वित करीत या प्रकरणातील मुख्य आरोपीच्याही मुसक्या आवळल्या आहे. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी आकाशसिंग विजय बहाद्दूरसिंग राजपूत याला पोलिसांनी बिहार येथून ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाशसिंग यानेच मुथूट कार्यालयात दराडो सुरू असताना धोक्याचा इशारा देणारा अलार्म वाजविणाºया अभियंता साजू सॅम्युअल यांच्यावर गोळीबार करून त्याची हत्या केली होती. यावेळी आकाशसिंगने त्याच्या पिस्तुलातील पाच गोळ्या झाडल्या होत्या. त्यातील तीन गोळ्या साजू सॅम्युअलला लागून त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात पोलिसांना यापूर्वी दोन आरोपी सापडले असून, त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सलग १६ दिवस आकाशसिंगचा माग काढून त्याला अटक केली आहे. त्याच्याकडून एक स्विफ्ट डिझायर कारही पोलिसांनी हस्तगत केली आहे. सुमारे दीड महिन्यांपूर्वी संपूर्ण शहर हादरवून सोडणाºया या गुन्ह्याचा तपास अंबडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीपाद परोपकारी यांच्या नेतृत्वात होता. त्यांना मुख्य आरोपी आकाशसिंग बिहारमध्ये असल्याचा सुगावा लागताच त्यांनी पोलीस उपनिरीक्षक तुषार चव्हाण यांच्यासह अंबड पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांचे एक पथक तपासासाठी बिहारला रवाना केले होते. त्यासोबतच युनिट दोन सहायक पोलीस आयुक्त आर. आर. पाटील यांचे पथकही ९ जुलैला बिहारमध्ये रवाना झाले होते. या दोन्ही पथकांनी सलग १६ दिवसांच्या प्रयत्नांतर आकाशसिंग पोलिसांच्या हाती लागला असून, त्याला अटक करण्यात आली आहे. पोलीस उर्वरित आरोपीचाही शोध घेत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.बिहारी वेशात रचला सापळाआकाशसिंगचा शोध घेताना पोलिसांना स्थानिक भाषा आणि पेहराव यामुळे ओळखले जात होते. त्यामुळे आकाशसिंगच्या जवळ पोहोचूनही त्याला पकडण्यात अडचणी येत असल्याने तपास पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बिहारी वेशभूषा व भाषा आत्मसात करून सापळा रचला व आकाश सिंगला अटक केली.
साजू सॅम्युअलवर गोळ्या झाडणाऱ्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2019 12:50 AM