नाशिक : काठे गल्ली परिसरातील एका मोबाइल विक्रीच्या दुकानावर पाळत ठेवून मध्यरात्रीच्या सुमारास दुकानाची खिडकी तोडून प्रवेश करत सुमारे सहा लाख ४७ हजारांचे मोबाइल लंपास करणार्या मुख्य सूत्रधारासह चौघा संशयितांना भद्रकाली पोलिसांनी अटक केली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बनकर चौकामधील शुभवास्तू अपार्टमेंटच्या १२ क्रमांकाच्या गाळ्यातील मोबाइल शॉपीमध्ये नंदू परदेशी अत्राम याने पाळत ठेवून दुकानाची खिडकी मध्यरात्री तोडली. खिडकीचे गज वाकवून दुकानात प्रवेश करून विक्रीसाठी ठेवलेले विविध कंपन्यांचे महागडे ४४ अॅन्ड्राईड मोबाइल घेऊन पोबारा केला होता. याप्रकरणी सुहाग विष्णुभाई पटेल (३३, रा. जनरल वैद्यनगर) यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांच्याकडे होता. साबळे यांनी गुन्ह्यातील चोरीला गेलेले मोबाइल पुण्यामधील धानोरीला वापरले जात असल्याची माहिती मिळविली. गुन्हे शोध पथकासह साबळे यांनी धानोरी गाठून मोबाइलचा वापर करणारे अनिल बबन केंगळे, संदीप शंकर टिंगरे, सागर बाजीराव फराटे यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी मोबाइल पुण्याच्या राजगुरूनरमधील नागेश बापू मेमाने यांच्या दुकानातून खरेदी केल्याचे सांगितले. पोलिसांनी या माहितीच्या आधारे राजगुरूनगरमधील मोबाइल विक्रेता मेमानेच्या मुसक्या आवळल्या. दरम्यान, त्याने सागर मुरलीधर आंबेकर (रा. वाघाडी, पंचवटी) याने त्याचा मित्र नंदूकडून मोबाइल घेऊन दुकानात आणून दिले व आंबेकर हा माझा मावसभाऊ आहे, अशी कबुली दिली. पोलिसांनी अत्राम या मुख्य सूत्रधारासह आंबेकर व मोबाइल विक्रेता मेमाने यास अटक केली आहे. या गुन्ह्यात चोरीचे मोबाइल खरेदी के ल्याप्रकरणी केंगळे, टिंगरे, फराटे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस उपआयुक्त विजय मगर, लक्ष्मीकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. ४३ मोबाइल, डीव्हीआर, वायफाय हस्तगत करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. दुकानामध्ये चोरी करताना दुकानामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असल्याचे अत्राम याच्या लक्षात आल्याने डीव्हीआर यंत्र त्याने पळविले होते.
नाशिकमधील मोबाईलच्या दुकानातून ४४ मोबाईल पळवून पुण्यात विक्री करणारा जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2017 9:04 PM
मोबाइल पुण्याच्या राजगुरूनरमधील नागेश बापू मेमाने यांच्या दुकानातून खरेदी केल्याचे सांगितले. पोलिसांनी या माहितीच्या आधारे राजगुरूनगरमधील मोबाइल विक्रेता मेमानेच्या मुसक्या आवळल्या.
ठळक मुद्दे४३ मोबाइल, डीव्हीआर, वायफाय हस्तगत मोबाइल शॉपीमध्ये नंदू परदेशी अत्राम याने दुकानाची खिडकी मध्यरात्री तोडली