उमराणे : येथील स्व. निवृत्तीकाका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या आठवडाभरापासून सुरू झालेल्या भाजीपाला लिलावात टमाटा मालाची प्रचंड आवक वाढली आहे. बाजारभाव जेमतेम मिळत असल्याने किमान उत्पादनासाठी केलेला खर्च तरी निघावा यासाठी शेतकऱ्यांची टमाटा माल विक्रीसाठी धडपड असल्याने एकाच दिवशी सुमारे चार ते पाच हजार क्रेट्स टमाटा मालाची आवक होत असल्याचे चित्र आहे.
उमराणेसह परिसरात कांदा, मका, डाळिंब व भाजीपाला आदी शेतमालाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. परंतु येथील बाजार समितीत कांदा व भुसार मालाची मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री होत असल्याने डाळिंब व भाजीपाला विक्रीसाठी परिसरातील शेतकऱ्यांना इतर बाजार समितींचे उंबरठे झिजवावे लागत होते. त्यामुळे डाळिंब व भाजीपाला लिलाव सुरू करण्यात यावेत, अशी मागणी उमराणेसह परिसरातील डाळिंब व भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांकडून करण्यात आली होती. त्या अनुषंगाने मागील वर्षी बाजार समितीच्या मुख्य प्रशासक सोनाली विलास देवरे व प्रशासकीय संचालक मंडळाच्या प्रयत्नांतून डाळिंब व भाजीपाला लिलाव सुरू करण्यात आला होता. त्यास खरेदीदार व शेतकऱ्यांकडून प्रतिसाद मिळाल्याने या वर्षीही १५ ऑगस्टपासून भाजीपाला लिलाव सुुुुरू करण्यात आला आहे. चालू वर्षी उमराणेसह परिसरात टमाटा पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड झाल्याने बाजारात टमाटा मालाची प्रचंड आवक होत असल्याचे चित्र आहे. मात्र इतरत्र मागणी नसल्याने बाजारभाव खुूपच कमी मिळत असल्याने नफा तर दूरच, परंतु किमान उत्पादन खर्च तरी पदरात पडावा यासाठी टमाटा विक्रीसाठी शेतकरी गर्दी करत असल्याने बाजार समितीत मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. टमाटा माल प्रति क्रेेट्स (२० किलोसाठी) जास्तीत जास्त १४० रुपये, कमीत कमी ३० रुपये, तर सरासरी ८५ रुपये दराने विक्री झाला आहे. तसेच कोबी ४ रुपये किलो व मिरची २३ रुपये दराने विकली गेेेली. भाजीपाला खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात व्यापारी असल्याने शेतीमाल चांगल्या दराने विक्री होत भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांनी प्रतवारी करून माल विक्रीस आणावा, असे आवाहन बाजार समितीचे सचिव नितीन जाधव व सहायक सचिव तुषार गायकवाड यांनी केले आहे.
उमराणे बाजार समितीत टमाटा विक्रीसाठी झालेली गर्दी. (२५ उमराणे टोमॅटो)
250821\25nsk_15_25082021_13.jpg
२५ उमराणे टोमॅटो